खराब साईडपट्ट्यांनी अपघात
By Admin | Updated: December 15, 2014 22:45 IST2014-12-15T22:45:44+5:302014-12-15T22:45:44+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते कशेडी घाट दरम्यान महामार्गालगतच्या साईडपट्ट्याच नामशेष झाल्या आहेत. या प्रकाराने सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत

खराब साईडपट्ट्यांनी अपघात
दासगांव : मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते कशेडी घाट दरम्यान महामार्गालगतच्या साईडपट्ट्याच नामशेष झाल्या आहेत. या प्रकाराने सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत, मात्र या गंभीर बाबीकडे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी संघटनांकडून व वाहनचालकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई - गोवा महामार्गावर इंदापूर ते कशेडी घाट जवळपास ७५ कि.मी. अंतरामध्ये अत्यंत नागमाडी वळणे आहेत. या वळणावरच्या अनेक ठिकाणी साईडपट्ट्याच नाहीशा झाल्या आहेत. भरवेगात जाणारे वाहन वळणावर समोरील वाहनाला एखादे वेळी चुकविताना रस्त्याखाली उतरुन कलंडी होवून पलटी होत अपघात होतो, तसेच काही ठिकाणी महामार्गावर सरळ रस्ता आहे. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या जागोजागी नाहीशा झाल्या असून अशा ठिकाणी झुडुपांचे व गवतांचे रान माजले आहे. वाहन चालकाच्या समोरुन येणाऱ्या वाहनाला त्याच्या पाठीमागून येणारे ओव्हरटेक करत असेल तर वाहनचालक या झुडपांच्या खाली साईडपट्टी असल्याचे गृहित धरुन वाहन रस्त्याकडेला उतरतात, मात्र साईडपट्टी नसल्याने वाहन कडेच्या गटारात जाऊन पलटी होते.
मागील वर्षभरात इंदापूर ते कशेडी दरम्यान मोठ्या प्रमाणावर अपघात झाले असून या अपघातामध्ये साईडपट्टी नसल्याने भीषण अपघात झाल्याचे प्रमाण अधिक आहे. शासन मुंबई-गोवा महामार्गावर रस्तारुंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण यासाठी करोडो रुपये खर्च करते. महामार्ग पेण बांधकाम विभागाकडून दरवर्षी या कामांच्या अंतर्गत साईडपट्टी दुरुस्तीचे काम करण्यात येत असते, मात्र हे काम बाहेरुन माती आणून भराव केले जाते किंवा डोंगर उत्खनन करुन निर्माण झालेल्या मातीचा भराव रस्त्यालगत टाकून साईडपट्ट्या केल्या जातात. यावर मजबुतीकरणासाठी रोलर फिरवण्यात येत नसल्याने पावसाळ्यात ही भरावाची माती वाहून जाते व रस्ता अपघातांना आमंत्रण देणारा हो असतो.
दरवर्षी साईडपट्ट्यांचे काम काढून लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची क्षमता २४ मेट्रीक टन इतकी आहे. मात्र ४० मेट्रीक टन एवढी वाहतूक करणारी अवजड वाहने दर दिवशी महामार्गावरुन जा-ये करत असतात. त्यामुळे ही जड वाहने पावसाळ्यात साईडपट्टीवर उतरल्यानंतर एकतर मातीत रूततात किंवा रस्त्याकडेला बंद पडलेली दिसतात.