बनावट तिकीटामार्फत विमानतळावर प्रवेश
By Admin | Updated: June 6, 2015 01:46 IST2015-06-06T01:46:33+5:302015-06-06T01:46:33+5:30
बनावट तिकिट दाखवून विमानतळावर गेलेल्या शाश्वतकुमार गंगवार(२१) या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणाला विमानतळ पोलिसांनी गजाआड केले.

बनावट तिकीटामार्फत विमानतळावर प्रवेश
मुंबई : बनावट तिकिट दाखवून विमानतळावर गेलेल्या शाश्वतकुमार गंगवार(२१) या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणाला विमानतळ पोलिसांनी गजाआड केले. दिल्लीहून आलेल्या मित्राला सोडण्यासाठी विमानतळावर जायला मिळावे म्हणून गंगवारने बनावट तिकिट तयार केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले. बुधवारी रात्री आंतरराज्यीय विमानतळावर हा प्रकार घडला.
शाश्वतकुमार साकिनाका येथील सागर हाईटस इमारतीत राहातो. काही दिवसांपुर्वी त्याचा मित्र अन्नू मलिक दिल्लीहून मुंबईत आला होता. बुधवारी रात्री तो दिल्लीला परत जाणार होता. मलिक विमानात बसेपर्यंत त्याच्यासोबत राहावे, अशी शाश्वतची इच्छा होती. त्यासाठी त्याने मलिकचे ई तिकिट ब्ल्यू टूथने स्वत:च्या मोबाईलवर घेतले. लॅपटॉपमध्ये करामत करून मलिकऐवजी स्वत:चे नाव घातले. अशा प्रकारे तो विमानतळावर प्रवेश मिळविला. प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) जवानांना त्यांनी बनवले. मात्र विमानतळाबाहेर पडताना याच जवानांनी त्याला हटकले. मला विमान पकडायचे नव्हते म्हणून मी परत आलो, अशी थाप शाश्वतने मारली.
मात्र ती पचली नाही. जवानांनी त्याला तिकिट रद्द केल्याची पावती दाखवण्यास सांगितले. तेव्हा मात्र शाश्वतला घाम फुटला. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे जवान सतर्क झाले. त्यांनी स्वत:च विमानतळ कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. तिकिटाची तपासणी केली तेव्हा ते मलिकच्या नावे असून तो दिल्लीला जाणाऱ्या विमानात असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर जवानांनी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. बनावट तिकिट तयार करण्याच्या गुन्ह्यात शाश्वतला अटक केली. न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी शाश्वतचा मोबाईल आणि बनावट तिकीट बनविण्यासाठी वापरलेला लॅपटॉप हस्तगत केला आहे.
बनावट तिकिट तयार करण्याच्या गुन्ह्यात शाश्वतला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी शाश्वतचा मोबाईल व बनावट तिकीट बनविण्यासाठी वापरलेला लॅपटॉप हस्तगत केला आहे.