Join us

वर्सोवा-दहीसर सागरी मार्गाला गती; पालिकेकडून सहा टप्प्यांसाठी ४ कंपन्यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 10:13 IST

१६ हजार ६२१ कोटी रुपये खर्च. 

मुंबई : मुंबई सागरी किनारा मार्गाचा विस्तार करताना आता वर्सोवा ते दहीसर किनारा मार्ग प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या मार्गातील सहाटप्प्यांतील बांधकामांसाठी ऑगस्टमध्ये निविदा  काढण्यात आली होती. 

दरम्यान, पालिकेकडून ४ कंपन्यांची निवड शुक्रवारी अंतिम करण्यात आली आहे. या मार्गासाठी १६ हजार ६२१ कोटी रुपये खर्च येणार असून, साधारण २२ किलोमीटर  लांबीच्या वर्सोवा - दहीसर सागरी किनारा मार्गामुळे प्रवास वेगवान होणार आहे. सध्या मरिन ड्राइव्ह ते वरळीदरम्यान सागरी किनारा मार्गाचे काम सुरू असून, कोस्टल रोड प्रकल्पाचे एकूण ८२ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. येत्या मे महिन्यापासून एक टप्पा सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. 

 हा सागरी किनारा मार्ग वांद्रे ते वरळी सी लिंकला जोडला जाणार आहे. 

 याबरोबरच महापालिकेने दहीसर ते भाईंदर उन्नत रस्ता प्रकल्पाच्या कामांसाठीही एल ॲण्ड टी कंपनीची निवड केली आहे. 

वाहनचालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न :

या सर्व मार्गांना नव्याने होणाऱ्या वर्सोवा - दहीसर सागरी किनारा मार्गाची जोड मिळणार आहे. हा मार्ग काही पट्ट्यात दुहेरी उन्नत मार्ग असेल, जो सी लिंकप्रमाणे केबल स्टेड पुलाप्रमाणे बनवला जाईल, तर काही पट्ट्यात तो खाडी खालून जाणार आहे. गोरेगाव - मुलुंड लिंक रोडचीही जोड देऊन पश्चिम, पूर्व द्रूतगती मार्गावरील वाहनचालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

 या मार्गाच्या बांधकामासाठी ऑगस्टमध्ये निविदा काढण्यात आली होती. यासाठी ६ कंपन्या अखेरपर्यंत शर्यतीत होत्या. 

 अखेर शुक्रवारी पालिकेकडून अंतिम ४ कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील ४ वर्षांत हे काम पूर्ण होऊन हा मार्ग सुरू करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. 

टॅग्स :मुंबईदहिसर