अकासा सुरू करणार मुंबई ते श्रीनगर विमान सेवा
By मनोज गडनीस | Updated: February 6, 2024 17:28 IST2024-02-06T17:28:33+5:302024-02-06T17:28:58+5:30
अकासा विमान कंपनीने आता मुंबई ते श्रीनगर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकासा सुरू करणार मुंबई ते श्रीनगर विमान सेवा
मनोज गडनीस, मुंबई : गेल्या दीड वर्षांपूर्वी भारतीय हवाई क्षेत्रात विमान व्यवसाय सुरू करणाऱ्या अकासा विमान कंपनीने आता मुंबई ते श्रीनगर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या सेवेची सुरुवात येत्या १ मार्चपासून होणार आहे. या निमित्ताने कंपनीने आता देशातील १७ व्या मार्गावर आपली विमान सेवा सुरू केली आहे. प्राप्त माहितीनुसार, मुंबई ते श्रीनगर या मार्गासाठी कंपनीचे विमान दररोज उड्डाण करणार असून मुंबईतून सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी विमान श्रीनगरसाठी रवाना होईल. हे विमान श्रीनगर येथे १ वाजून २० मिनिटांनी दाखल होईल. तर श्रीनगर येथून मुंबईला परतण्यासाठी विमान १ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण करेल व ते संध्याकाळा ७ वाजता मुंबईत दाखल होईल. हे विमान नॉन-स्टॉप असेल.
दरम्यान, अलीकडेच कंपनीला परदेशी उड्डाणासाठी देखील अनुमती प्राप्त झाली असून येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय मार्गांवर देखील कंपनी विमान सेवा सुरू करणार असल्याची माहिती आहे.