Join us  

‘बेस्ट’च्या एसी बसने फोडला घाम; ऐन उन्हाळ्यात एसी यंत्रणा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 10:21 AM

प्रवासी आणि चालक-वाहकांमध्ये खटके.

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात बस गाड्या कमी असल्याने आधीच कडक उन्हात ताटकळणाऱ्या प्रवाशांना एसी बसमध्ये चढल्यावरही गारेगार प्रवास दुरापास्त होत असल्याचे उघडकीस येत आहे. अनेक मिडी बसमधील वातानुकूलित (एसी) यंत्रणा बंद असल्याने दारे, खिडक्या उघड्या ठेवाव्या लागत आहेत. तर, काही बसमधील एसी बंद ठेवला जात असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत. या मुद्द्यावरून प्रवासी आणि चालक-वाहक यांच्यात खटके उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

रेल्वेप्रमाणेच बेस्ट उपक्रमाची बससेवा मुंबईकरांची प्रवास वाहिनी आहे. दररोज शहर आणि उपनगरात ‘बेस्ट’ बसने लाखोंच्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. मुंबईकरांचा प्रवास सुखकर, आरामदायी व्हावा, यासाठी ‘बेस्ट’कडून एसी बस चालवल्या जात आहेत. असे असले तरी सध्या बहुतांश बसमधील एसी यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने प्रवासी घामाघूम होत आहेत. त्यामुळे त्याची उपयोगीता आता शून्य असल्याचे समोर येत आहे. 

बेस्ट उपक्रमाला एसी बसच्या देखभालीचा भार सोसवत नसेल, तर विनावातानुकूलित बस पुन्हा सेवेत आणाव्यात, मात्र प्रवाशांची गैरसोय करू नये, असा संताप प्रवासी व्यक्त करत आहेत. 

बेस्ट उपक्रमाच्या अनेक बसमधील विशेषतः मिडी बसमधील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने, बसचे दरवाजे, खिडक्या खुल्या करून बस चालवल्या जात आहेत. विक्रोळी, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, मरोळ, कुर्ला, गोवंडी या भागात धावणाऱ्या बसमधील वातानुकूलित यंत्रणा कायम बंद असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

वाढीव रेंजसाठी ‘एसी’ बंद?

बेस्ट उपक्रमातील बहुतांश वातानुकूलित बस या इलेक्ट्रिक असून, या गाड्यांचे ॲव्हरेज (रेंज) कमीच असते. त्यामुळे गाड्यांची रेंज वाढविण्यासाठी, बसमधील बॅटरी जास्त वेळ टिकावी, यासाठी कंत्राटी चालक बसमध्ये मुद्दामहून एसी बंद किंवा कमी ठेवतात. उपक्रमाच्या मिडी टाटा मारकोपोलो आणि हंसाच्या टेम्पो एसी बस तर अगदीच निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.  

बेस्टने स्वमालकीच्या विनावातानुकूलित बसगाड्या तत्काळ विकत घेणे गरजेचे आहे. एसी गाड्यांमधून प्रवास करणे प्रवाशांना गैरसोयीचा होत आहे. त्यामुळे बेस्ट प्रवासी कायमचा उपक्रमापासून दूर होऊन अन्य पर्याय निवडण्याची शक्यता आहे. सध्याच्या बंद असलेल्या यंत्रणेवर काम करून प्रवाशांना दिलासा द्यावा.- रूपेश शेलटकर, आपली बेस्ट आपल्याचसाठी संस्था

टॅग्स :मुंबईबेस्ट