Join us
Daily Top 2Weekly Top 5

नावाचीच एसी, बाकी प्रवासी ‘घामाघूम’; तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 10:24 IST

रविवारी पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवासी घामाघूम झाले.

मुंबई : अयोध्येत रामरायाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त असलेल्या सुटीचा सदुपयोग करण्यासाठी सोमवारी अनेकांनी घराबाहेर पडण्याला पसंती दिली; मात्र त्याचवेळी अनेक खासगी कार्यालयेही सुरू होती; परंतु रेल्वे प्रशासनाने रविवार वेळापत्रकानुसार गाड्या चालविल्याने प्रवाशांचे हाल झाले; तसेच पश्चिम रेल्वेवरएसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवासी घामाघूम झाले. राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त सोमवारी राज्य सरकारने सार्वजनिक सुटी, तर केंद्र सरकराने अर्धा दिवस सुटी जाहीर केली होती; मात्र मुंबई आणि उपनगरातील खासगी कार्यालये सुरू होती. 

५०० लोकल फेऱ्या रद्द :

तरीदेखील मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने सोमवारी रविवार वेळापत्रकानुसार लोकल चालविल्याने दोन्ही मार्गांवर अंदाजित ५०० लोकल फेऱ्या रद्द होत्या. त्यामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला. 

लोकल ३० ते ४० मिनिटे उशिराने धावल्या :

 चर्नी रोड स्थानकात सोमवारी चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. 

 ही घटना सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांच्या सुमारास घडल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा खोळंबली होती. 

 त्यामुळे लोकल सेवा एकामागे एक उभ्या होत्या. 

 त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या.

  दरम्यान, जलद गाड्या धिम्या मार्गावरून वळविण्यात आल्या होत्या.

  त्यामुळे धिम्या मार्गावरील लोकलचे वेळापत्रक देखील कोलमडले होते.

टॅग्स :मुंबईपश्चिम रेल्वेएसी लोकल