पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकल पूर्वसूचनेशिवाय रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 06:52 IST2018-06-16T06:52:13+5:302018-06-16T06:52:13+5:30

पश्चिम रेल्वेवरील सकाळच्या वेळेतील वातानुकूलित लोकल अचानक रद्द करण्यात आल्यामुळे, शुक्रवारी शेकडो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

 AC local on Western Railway route is canceled without prior notice | पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकल पूर्वसूचनेशिवाय रद्द

पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकल पूर्वसूचनेशिवाय रद्द

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील सकाळच्या वेळेतील वातानुकूलित लोकल अचानक रद्द करण्यात आल्यामुळे, शुक्रवारी शेकडो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. लोकल रद्द झाल्याची कोणतीच माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने न दिल्यामुळे प्रवाशांनी माध्यमांकडे तक्रार दाखल केली. अखेर देखभाल-दुरुस्तीसाठी लोकल रद्द केल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले.
१० वाजून २२ मिनिटांनी सुटणारी विरार-चर्चगेट वातानुकूलित
लोकल शुक्रवारी अचानक रद्द करण्यात आली. लोकल रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली. यातच प्रशासनाकडून कोणतीही माहिती न मिळाल्याने, प्रवाशांच्या संतापात आणखी भर पडली.
देशातील पहिल्या वातानुकूलित लोकलला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद लाभत आहे. नाताळच्या मुहूर्तावर एसी लोकल सुरू झाली. सद्यस्थितीत विरार-चर्चगेट मार्गावर एसी लोकल धावत आहे. प्रथम दर्जापेक्षा अधिक भाडे असलेल्या वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या रद्द करताना, किमान एक दिवस आधी प्रवाशांना माहिती देण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी या वेळी केली.

देखभाल-दुरुस्तीसाठी निर्णय
लोकल देखभाल-दुरुस्तीच्या कारणास्तव वातानुकूलित लोकलच्या जागी साधी लोकल चालविण्यात आली. सोमवारी १८ जूनपासून वातानुकूलित लोकल वेळापत्रकाप्रमाणे धावेल.
- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे.

Web Title:  AC local on Western Railway route is canceled without prior notice