एसी लोकल सप्टेंबरपर्यंत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2015 01:55 IST2015-04-19T01:55:23+5:302015-04-19T01:55:23+5:30
उपनगरीय प्रवाशांचा प्रवास गारेगार होण्याची स्वप्ने लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. उपनगरीय प्रवाशांच्या ताफ्यात येणारी एसी लोकल सप्टेंबर महिन्यापर्यंत दाखल होईल,

एसी लोकल सप्टेंबरपर्यंत दाखल
रेल्वेमंत्र्यांची माहिती : आॅक्टोबर हीटच्या तडाख्यातून प्रवाशांचा प्रवास सुकर
मुंबई : उपनगरीय प्रवाशांचा प्रवास गारेगार होण्याची स्वप्ने लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. उपनगरीय प्रवाशांच्या ताफ्यात येणारी एसी लोकल सप्टेंबर महिन्यापर्यंत दाखल होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पही लवकरच मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू असून, जपानशी आर्थिक निधीबाबत बोलणी सुरू असल्याचेही प्रभू यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वे युनियनच्या कार्यक्रमानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. एसी लोकलचा मुहूर्त बराच वेळ चुकला असून, ही लोकल ताफ्यात येणार कधी, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता सप्टेंबर महिन्यापर्यंत लोकल प्रवाशांच्या ताफ्यात दाखल होईल, असे प्रभू यांनी सांगितले. त्यामुळे आॅक्टोबर हीटच्या तडाख्यातून लोकल प्रवाशांचा प्रवास सुकर होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ही माहिती देतानाच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत प्रभू म्हणाले, की या कामाला गती देण्यात येत असून, त्याचा अभ्यासपूर्ण अहवाल तयार झाला आहे. याबाबत जपानच्या मंत्र्यांशीही बोलणे सुरू असून, आर्थिक निधी उपलब्ध करण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. बुलेट ट्रेनचा प्रकल्प मोठा असून, हा प्रकल्प पूर्ण होण्यास थोडा कालावधी लागेल, असेही त्यांनी सांगितले. रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या देशभरातील ५0 सॅटेलाइट टर्मिनसपैकी दोन मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात असतील. यामध्ये ठाकुर्ली आणि पनवेल टर्मिनसचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
एसी डबल डेकर ट्रेन सध्या सायडिंगलाच ठेवण्यात आली असून, ती चार महिन्यांपासून धावलेली नसल्याचे विचारताच त्याचे देखभाल-दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. ही ट्रेन लवकरच कोकण प्रवाशांसाठी धावेल, असे प्रभू म्हणाले. तर पुढे कोकणासाठी जादा गाड्या सोडण्याचा विचारही केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेमार्गावर दुहेरी मार्गाच्या कामाला गती देण्यात येत आहे. मात्र कोकण रेल्वेवर या कामाचा अजूनही पत्ता नसल्याचे विचारताच दुहेरी कामाला गती देण्यात येईल. सध्या कोकण रेल्वे फायद्यात नसून, अनेक अडचणी आहेत. तरीही त्यातून मार्ग काढत असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले. कोकणातील मार्गाच्या दुहेरीकरणाबाबत आपण कोकण रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. दुहेरी कामासाठी लागणाऱ्या निधीबाबतही त्यांच्याशी चर्चा केल्याचे ते म्हणाले.