Join us

कांदिवलीत पोलिसाला शिवीगाळ, मारहाण; कारच्या काचेवर ठोसा मारल्यावरून वाद

By गौरी टेंबकर | Updated: December 30, 2023 19:05 IST

रायगड पोलिसात शिपाई असलेल्या कर्मचाऱ्याला कांदिवली परिसरात शिवीगाळ करत मारहाण केली गेली.

मुंबई: रायगड पोलिसात शिपाई असलेल्या कर्मचाऱ्याला कांदिवली परिसरात शिवीगाळ करत मारहाण केली गेली. या विरोधात त्यांनी अनिल ठाकूर नामक व्यक्तीसह चौघांविरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. तक्रारदार सागर मस्के (३०) हे रायगड पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असून त्यांची पत्नी स्मिता या मुंबई पोलीस दलात त्याच पदावर कार्यरत आहेत. सागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ डिसेंबर रोजी रात्री १.१५ च्या सुमारास ते पत्नीसह त्यांच्या लहान बाळाला घेऊन रायगडला निघाले होते. 

कांदिवली पश्चिमच्या जरी मरी माता मंदिरासमोर वाहनांची गर्दी असल्याने त्यांनी कारचा वेग कमी केला. काही वेळाने दारूच्या नशेत असलेला लाल रंगाचे शर्ट परिधान केलेला एक इसम मोटर सायकलवरून आला आणि त्याने सागरच्या गाडीच्या आरशावर हाताने ठोसा मारला. याचा जाब सागरनी विचारल्यानंतर त्या दारुड्याने त्यांनाच शिवीगाळ करायला सुरुवात केली. सागरने ते पोलीस असल्याची ओळख सांगितल्या नंतरही सदर व्यक्तीने फोन करत अजून तीन लोकांना बोलावले. त्यांनी देखील सागर यांच्याशी हुज्जत घालत त्यांना हाताने मारहाण करायला सुरुवात केली. अखेर पोलिसांना फोन करण्याचे सांगितल्यावर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. याप्रकरणी सागर यांनी कांदिवली पोलिसात तक्रार दिल्यावर ठाकूर याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी