Join us  

अबू आझमींचं दिल्लीतील हिंसाचाराशी कनेक्शन; भाजप नेत्याचं थेट अमित शहांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 4:53 PM

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचं कनेक्शन हे मुंबईतील आझाद मैदानातील अबू आझमींच्या भाषणाशी आहे का?

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचं कनेक्शन हे मुंबईतील आझाद मैदानातील अबू आझमींच्या भाषणाशी आहे का? याची चौकशी करा, अशी मागणी करणारं पत्र भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलं आहे. भातखळकर यांच्या पत्रानं आता दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईतही राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

"घर घर से बाहर निकलो, कोहराम मचा दो, मोदी तेरी राख कर देंगे. मोदीजी तुम खतम हो जाओगे", अशी वक्तव्य आझमी यांनी मुंबईतील भाषणात केल्याचं भातखळकर यांनी पत्रात म्हटलं आहे. अबू आझमी यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली असून त्यामागचा बोलवता धनी कोण हे शोधायला हवं, असं आवाहन भातखळकर यांनी केलं आहे. 

 

भातखळकर पत्रात काय म्हणाले?देशाच्या कृषी क्षेत्रात क्रांतीकारी बदल आणण्यासाठी केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केले. पण काही राजकीय पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं आणि त्यांची माथी भडकवण्याचं काम करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत आझाद मैदानात २५ जानेवारी २०२१ रोजी शेतकरी आंदोलन करण्यात आलं. यात व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. या आंदोलनाला संबोधित करताना समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी भडकाऊ विधानं केली आहेत. आझमी यांनी लोकांना घराबाहेर पडून गोंधळ घालण्याचं आवाहन केलं होतं. यात मोदींबद्दल आक्षेपार्ह विधानं देखील केली आहेत. अबू आझमींनी केलेल्या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी २६ जानेवारी २०२१ ला दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या आडून गोंधळ घालण्याचा प्रकार घडला. त्यामुळे अबू आझमींची चौकशी करणं आवश्यक आहे, असं अतुल भातखळकर यांनी पत्रात म्हटलं आहे.  

टॅग्स :अतुल भातखळकरअबू आझमीशेतकरी संपअमित शहा