बेपत्ता फय्याजमुळे तपास यंत्रणांची फरफट
By Admin | Updated: September 20, 2015 01:00 IST2015-09-20T00:45:35+5:302015-09-20T01:00:24+5:30
कल्याणमधील चौधरी मोहल्ल्यातून बेपत्ता झालेला अभियंता तरुण वर्षभराने परतला खरा, पण या काळात त्याच्या गायब असण्याने देशभरातील तपास आणि गुप्तचर यंत्रणांची झोप

बेपत्ता फय्याजमुळे तपास यंत्रणांची फरफट
- डिप्पी वांकाणी, मुंबई
कल्याणमधील चौधरी मोहल्ल्यातून बेपत्ता झालेला अभियंता तरुण वर्षभराने परतला खरा, पण या काळात त्याच्या गायब असण्याने देशभरातील तपास आणि गुप्तचर यंत्रणांची झोप उडाली होती. त्यांची या बेपत्ता तरुणामागे जी असह्य फरफट झाली, ती वेगळीच.
गेल्या वर्षी चौधरी मोहल्ल्यातील चार तरुण अरिफ माजीद, शाहीन टंकी, फहाद शेख आणि अमन तांडेल इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सिरियात (इसिस) दाखल होण्यासाठी गेले होते व हा तरुण नेमका त्याच सुमारास स्वत:च्याच घरातून ५ लाख रुपये चोरून बेपत्ता झाला होता. फय्याज शेख (या तरुणाची मूळ ओळख जाहीर न करण्यासाठी नाव बदललेले आहे) घरी परतल्यापासून अनेक गुप्तचर संस्थांचे त्याच्याकडे पूर्ण लक्ष आहे.
गेले वर्षभर हा इसिससोबत होता की अन्य कुठे होता, याची पुरती खातरजमा करून घेण्याचे काम सुरू झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील (एसीबी) त्याच्याबद्दल माहिती मिळाली आहे. ही माहिती त्यांनी दहशतवादविरोधी पथकालाही (एटीएस) दिली होती. त्यानंतर एटीएसने गुप्तपणे वरिष्ठ पातळीवर केलेल्या चौकशीचा निष्कर्ष हा फय्याज शेख इसिसकडे गेला नव्हता तर उत्तर प्रदेशात मुक्कामाला होता असा निघाला आहे. फय्याजने तो उत्तर प्रदेशात जेथे कुठे राहिला होता, असा दावा केला त्या ठिकाणांची खातरजमा करून घेण्यासाठी एटीएसची तुकडीही सध्या उत्तर प्रदेशातच आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
मे २०१४मध्ये अरिफ माजीद, शाहीन टंकी, फहाद शेख आणि अमन तांडेल मध्य पूर्वेतील धार्मिक पर्यटनासाठी भारतातून तर गेले; नंतर ते गायब झाले होते. नोव्हेंबरमध्ये अरिफ तुर्कीहून भारतात आला होता. त्याची चौकशी करण्यात आल्यावर त्याने त्यांनी केलेल्या चुकीच्या धाडसी घटनाक्रमाची माहिती अधिकाऱ्यांना दिली.
इसिसने जे युद्ध सुरू केले आहे त्यात शाहीन, फहाद आणि अमन हे अजूनही सक्रिय असल्याचे समजते. बेपत्ता झाल्याची कोणतीही तक्रार सध्या पोलीस खूप गांभीर्याने घेत आहेत. सूत्रांनी सांगितले की, आम्ही समांतर चौकशीही सुरू ठेवली होती आणि त्याच वेळी इतर चौकशी यंत्रणांशीही संपर्क ठेवला होता. फय्याज शेख अचानक अवतरल्यामुळे आम्ही त्याची चौकशी केली. आम्ही त्याचा पासपोर्ट तपासला, परंतु त्यावर व्हिसा स्टॅम्प नव्हता. शेखने तो घरून निघाल्यापासून संपूर्ण काळ उत्तर प्रदेशातच होतो, असा दावा केला आहे. इसिससंबंधात पोलिसांनी फय्याज शेखला क्लीन चिट दिली आहे का, असे विचारता त्याने उत्तर प्रदेशात राहिलो होतो, असे सांगितलेल्या दोन्ही पत्त्यांची खातरी केली आहे. मात्र त्याचा तेथे राहण्याचा उद्देश काय हे आताच आम्ही सांगू शकणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. फय्याज शेख बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी त्याच्या पालकांनी त्या भागातील सामाजिक कार्यकर्त्याची मदत घेतली होती. कल्याणमधील चौधरी मोहल्ल्यात जुम्मा मशीद गल्लीत माझा बंगला आहे. मी त्याच भागातील असल्यामुळे मी त्यांना भेटलो, असे सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक शाखेचे राज्याचे सचिव एरिक नरिमन धतीगडा यांनी सांगितले. धतीगडा म्हणाले की, ‘‘त्याच्या पालकांनी फय्याजने बेपत्ता व्हायच्या आधी घरातून ५ लाख रुपये चोरल्याचा आरोप केला होता. त्याचे एका महिलेने अपहरण केल्याचे सांगितले. मी नंतर ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व फय्याज बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घ्या अशी विनंती केली. मात्र या प्रकरणात एटीएसकडून चौकशी सुरू होती हे मला माहिती नव्हते. तो परत आल्याचीही मला माहिती नाही.’’ इसिसमधील सहभागाचे आकर्षण, त्यासाठी बेपत्ता होणारा तरुण हा विषय कमालीचा गंभीरपणे घेतलेल्या तपास यंत्रणांची फय्याजच्या तपासापायी त्यामुळेच तर असह्य फरफट झाली.
कोन हा फय्याज
पेशाने अभियंता असलेला फय्याज गेल्या वर्षी चौधरी मोहल्ल्यातून अचानक गायब झाला होता. तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी फय्याजचे एका महिलेने अपहरण केले असून, त्याने घरातून ५ लाख रुपये चोरल्याचा दावा केला होता. मग कल्याणमधून चार तरुण इसिसमध्ये जाण्यासाठी घरून पैसे चोरून कसे गेले याची चर्चा परिसरात सुरू झाली होती.