गोपाळकाल्याची लगबग
By Admin | Updated: August 18, 2014 00:16 IST2014-08-18T00:16:07+5:302014-08-18T00:16:07+5:30
कृष्ण जन्माष्टमीबरोबरच सोमवारी संपन्न होणा-या गोपाळकाल्यासाठी वसईत लगबग होती. नेहमीप्रमाणे दहीकाल्यासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंनी मंडई सजली होती.

गोपाळकाल्याची लगबग
अमर म्हात्रे, नायगांव
कृष्ण जन्माष्टमीबरोबरच सोमवारी संपन्न होणा-या गोपाळकाल्यासाठी वसईत लगबग होती. नेहमीप्रमाणे दहीकाल्यासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंनी मंडई सजली होती. बाजारात यासाठी मडकी उपलब्ध होती. यावर्षी त्यांच्या दरात वाढ झाली आहे. ७० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत विविध आकारांची, रंगाची मडकी वसईतल्या विविध मंडईत उपलब्ध होती.
कृष्णजन्माचे स्वागत करण्यासाठी लागणारी आर्टिफिशियल तोरणेही ६० ते १०० रुपयांपर्यंत आहेत. पाळणे, कृष्णमूर्तींनी मंडई अगदी हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र रविवारी होते. यावर्षी चायनामेड वस्तूंचे मोठे प्रस्थ हा सणावरती दिसून आले. आर्टिफिशियल ज्वेलरी, हार, कपडे यातही परदेशी व्यापारपेठ, अतिक्रमण करीत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने विविध भागातील बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या.
दहीकाला उत्सवाला दिवसागणिक व्यापारी स्वरुप आल्याची टीका होत असताना वसईत महिला पथकांची वाढती संख्या पहाता दहीहंडी कार्यक्रमातील महिलांचा सहभागही दिवसागणिक वाढत चाललेला दिसून येत आहे. बक्षिसासोबतच यावर्षी गोविंदा पथकांना विम्याचे संरक्षण आल्याने काही दिवसांपासूनच पालिकेने नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध केल्या होत्या. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. सरावासाठीही वर्षभर पथके मेहनत घेतात. काही वर्षांपूर्वीच राजकीय पक्षही या मैदानात उतरल्याने त्यास भव्य स्वरुप प्राप्त झाले. अधिकच स्पर्धाही वाढली. गोविंदा पथकांची वाढती संख्या व दहीहंड्यांचे प्रमाण पहाता बक्षिसेही वाढली.