Join us  

एमआयएम सायबर हल्ला; ८२ लाख वाचवले, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:01 AM

या प्रकरणाचा तत्काळ तपास सुरू करून गुन्हे शाखेच्या पथकाला ८२.५५ लाख रुपये वाचविण्यात यश आले आहे.

मुंबई : यूएईमधील कॅफेटेरियाचे बांधकाम साहित्य पुरवठा कंपनी असल्याचे भासवून इंटरनॅशनल शाळेची २३ फेब्रुवारी ते १६ मार्च दरम्यान मॅन इन द मिडल (एमआयएम) अटॅक करत ८७ लाख २७ हजारांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तत्काळ तपास सुरू करून गुन्हे शाखेच्या पथकाला ८२.५५ लाख रुपये वाचविण्यात यश आले आहे. 

मुंबईतील एका नामांकित इंटरनॅशनल स्कूलने कॅफेटेरियाचे बांधकाम साहित्य पुरवठा करण्यासाठी यूएईमधील युरो फोन अकुस्टिक्स या कंपनीशी करार केला. कंपनीने त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवरून कंपनीचे युएईमधील बँक डिटेल्स व्यवहारासाठी शाळा प्रशासनाला दिले होते. मात्र, सायबर भामट्याने ई-मेल आयडीसारखा दिसणारा बनावट ई-मेल आयडी तयार करून शाळेला नवीन बँक डिटेल्स पाठविले.

 शाळेने हुबेहूब दिसणाऱ्या ई-मेल आयडीवर विश्वास ठेवून नवीन खात्यावर ८७ लाख २६ हजार ९९५.६५ रुपये पाठविले. यूएईमधील युरो फोन अकुस्टिक्स कंपनीने पुन्हा ई-मेलच्या माध्यमातून पत्रव्यवहार केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. शाळेने प्रादेशिक सायबर पोलिस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार, अज्ञात ई-मेल आयडीधारकाविरोधात गुन्हा नोंदवत, मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रादेशिक सायबर पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस निरीक्षक मौसमी पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने तात्काळ पाठपुरावा करत ८२ लाख ५६ हजार रुपये वाचवून ही रक्कम पुन्हा खात्यात जमा केली आहे. 

काय काळजी घ्यावी... 

व्यवहार करताना कंपनीच्या योग्यतेबाबत शहानिशा करूनच करार करा. कराराव्यतिरिक्त ई-मेल आयडी व बँक डिटेल्समध्ये अचानक बदल केले गेले तर संबंधित कंपनीबरोबर व्यवहारापूर्वी खात्री करून घ्यावी. व्यवहारांदरम्यान ई-मेल आयडी, बँक खात्याची योग्य खातरजमा करा, फसवणूक झाल्यास १९३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हे शाखेने केले आहे. 

अशी करतात फसवणूक - 

मॅन इन द मिडल हल्ला हा एकप्रकारचा गुप्त हल्ला आहे. जेथे हल्लेखोर दोघांच्या संभाषण किंवा डेटा ट्रान्सफरमध्ये व्यत्यय आणतात. हुबेहूब बनावट आयडी तयार करून फसवणूक करतात. या हल्ल्यात, मधला सहभागी दोन वैध सहभागींपैकी कोणालाही अज्ञात असलेल्या संभाषणात फेरफार करून फसवणूक करतो.

टॅग्स :मुंबईसायबर क्राइमपोलिस