Join us  

‘ईव्ही’साठी चार हजार सोसायट्यांत ८,५०० शेअर चार्जर; चार्जिंगची सोय सहजपणे उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 10:42 AM

मुंबईच्या उपनगरांमधील चार हजार सोसायट्यांमध्ये साडेआठ हजार चार्जर लावण्यात आले आहेत.

मुंबई : इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग सहजपणे करता यावे, यासाठी गृहनिर्माण संस्थांमध्ये ‘शेअर चार्जिंग’ उपक्रम सुरू करण्यात आला असून, यात मुंबईच्या उपनगरांमधील चार हजार सोसायट्यांमध्ये साडेआठ हजार चार्जर लावण्यात आले आहेत.

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यावर सरकारचा भर आहे. मात्र, ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन्स नसल्याने सहजपणे ही वाहने खरेदी करण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत. मात्र, आता त्यावर ‘शेअर चार्जिंग’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सहज चार्जिंग उपलब्ध हाेत आहे. 

ॲपमार्फत व्यवस्था -

१) सोसायटीमध्ये एकापेक्षा अधिक शेअर चार्जिंग बसविता येतात.

२) वाहने चार्जिंगला कधी आणावीत, कोणी किती वेळ चार्जिंग केले व त्याचे बिल किती झाले ते ठरवून त्याचे पैसे देणे ही व्यवस्था ॲपमार्फत केली जाते.

३) एका चार्जवर अनेक गाड्यांचे चार्जिंग होऊ शकते.

एका वाहनाला लागतात साडेतीन तास -

एखाद्या गृहनिर्माण सोसायटीला इमारतीच्या आवारात ‘शेअर चार्जिंग’ सुरू करायचे असल्यास त्यांना अदानी इलेक्ट्रिसिटीकडे अर्ज करावा लागतो. त्यानुसार, ‘अदानी’कडून याकरिता स्वतंत्र वीज मीटर लावून ‘शेअर चार्जिंग’ सुरू केले जाते. 

एका ‘शेअर चार्जिंग’वर ३० रुपयांत एक दुचाकी पूर्णपणे चार्ज होते. तर एक चारचाकी वाहन चार्ज करण्यासाठी तीन ते साडेतीन तास लागतात; आणि यासाठी ३५० रुपये लागतात. या ‘शेअर चार्जिंग’वर कोणालाही वाहन चार्ज करता येते. वाहन चार्ज केल्यानंतर वॉलेटमध्ये जमा केलेले पैसे कोड स्कॅन करून भरता येतात.

आमच्या सोसायटीत शेअर चार्जिंग स्टेशन उभारण्याची कल्पना खूपच चांगली ठरली. ते अत्यंत सोईस्कर असून त्याचा रहिवाशांना मोठा फायदा झाला.- एम. गौतमन, सचिव, धीरज सवेरा टॉवर सहकारी गृहनिर्माण संस्था, सिद्धार्थ नगर, बोरीवली

शेअर चार्जिंग व्यवस्थेमुळे माझे पैसेही वाचले. प्रदूषण कमी करण्यासही माझ्याकडून हातभार लागला.- अमित मूलचंदानी, रुणवाल एलिजंट सहकारी गृहनिर्माण संस्था, शास्त्रीनगर, अंधेरी

टॅग्स :मुंबईइलेक्ट्रिक कार / स्कूटर