मुंबई :लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी मुंबई जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार पालिकेकडून ‘क’ संवर्गातील साडेसात हजार अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे अधिकारी कामासाठी हजर न झाल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी निर्देशित करण्यात आला आहे. पालिकेच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही आदेश काढले आहेत. त्यामुळे रुग्णलायतील विविध प्रस्ताव, पत्रे तयार करणे अशा महत्वाच्या कामावर गदा येणार असल्याची रुग्णालयात चर्चा सुरु आहे.
हे अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षणासाठी उपस्थित न राहिल्याने निवडणुकीच्या कामात झाल्याचे पत्र निवडणूक अयोग्य कार्यालयाकडून पालिका प्रशासनाला पाठविण्यात आले आहे. प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून दखल न घेतल्यास प्रशासनावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे.
महापालिकेकडून ज्या विभागातील साडेसात हजार अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत, त्या विभागांमध्ये महापालिका चिटणीस खाते, मुख्य लेखापरीक्षक, आयुक्त कार्यालय, प्रमुख लेखापाल, प्रमुख सुरक्षा अधिकारी, प्रमुख अभियंता, उपप्रमुख अभियंता, प्रमुख कामगार अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, प्रमुख अग्निशमन अधिकारी, घनकचरा व्यवस्थापनातील प्रमुख अभियंता, पर्जन्य जलवाहिन्या, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिस्सारण प्रचालन आणि प्रकल्प, रस्ते आणि वाहतूक या ४६ विभागांचा समावेश आहे.
पालिकेत निवृत्तीचेही प्रमाण अधिक असल्याने कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. आधीच आरक्षण सर्वेक्षण आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक पूर्वतयारीच्या कामांमुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांकडून प्रशिक्षणासाठी हजार राहण्यास टाळाटाळ होत आहे.
या रुग्णालयांचा समावेश :
मुंबई महापालिकेच्या प्रमुख पाच रुग्णालयातील जवळपास ४०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना ही इलेक्शन ड्युटी करावी लागणार आहे. या प्रमुख रुग्णालयांमध्ये के इ एम, सायन, नायर, नायर दंत, कूपर रुग्णालयाचा समावेश आहे.
या पाचही रुग्णलायत मोठया संख्यने मुंबई शहरातून व बाहेरून रुग्ण उपचार घेण्यास येत असतात. त्यामुळे या रुग्णलयावर पहिलाच कमालीचा ताण आहे.
वरिष्ठ डॉक्टरांचे कानावर हात :
या सगळ्या गोष्टीमुळे रुग्णालय सेवेवर परिणाम होणार आहे. हे प्रशासनाला व्यवस्थित माहिती आहे. मात्र त्यांनी तरीही रुग्णालयातील कर्मचारी वर्ग देण्याचा निवडणुकीच्या कामासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यासाठी कानावर हात ठेवला आहे.
आधीच मनुष्यबळाचा तुटवडा, त्यात हे काम :
पालिकेत निवृत्तीचेही प्रमाण अधिक असल्याने कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. लोकसभा निवडणूक कामांसाठी पालिकेने शहरासाठी दीड हजार आणि उपनगरासाठी सहा हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे.
यामध्ये महापालिकेच्या शिक्षणाधिकारी विभागातील चार हजार १८०, रस्ते आणि वाहतूक प्रमुख अभियंता विभागातील १४०, घनकचरा व्यवस्थापनातील ३००, जल अभियंता खात्यातील १८०, पाणीपुरवठा प्रकल्प प्रमुख अभियंता विभागातील ३०, यांत्रिकी व विद्युतमधील प्रमुख अभियंता विभागातील ४५, अग्निशमन दलातील ६५ अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यग्र असणार आहेत.