Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘अभ्यासोनी प्रकटावे’ ही राजदत्त, वासुदेव कामत यांच्याप्रती कृतज्ञता: सुनील बर्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 12:32 IST

कार्यक्रमास उषा मंगेशकर यांची प्रमुख उपस्थिती 

मुंबई: “राजदत्त आणि वासुदेव कामत हे दोघेही संस्कार भारतीचे पूर्वाध्यक्ष होते. नतमस्तक होऊन आवर्जून आशीर्वाद प्राप्त करावेत अशी ही कलाक्षेत्रातील अग्रगण्य अनुभवी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना ऐकण्याची, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची व त्यांचे कार्य समजून घेण्याची संधी ‘अभ्यासोनी प्रकटावे’ या संस्कार भारती आयोजित कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला प्राप्त होणार आहे. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे”, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते व संस्कार भारती कोकण प्रांत अध्यक्ष सुनील बर्वे यांनी केले. 

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे ३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता संस्कार भारती कोकण प्रांताच्या वतीने हा सन्मानसोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला कलाक्षेत्रातील मान्यवरांनी तसेच सर्वसामान्य रसिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बर्वे यांनी केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत तसेच मालिकाविश्वात दिग्दर्शकीय कर्तृत्वाने स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे राजदत्त यांना पद्मभूषण(२०२४) पुरस्काराने गौरवण्यात आले. वासुदेव कामत यांनी चित्रकला क्षेत्रात आपली वेगळी शैली निर्माण केली असून त्यांनाही उल्लेखनीय कामगिरीबद्दल पद्मश्रीने(२०२५) गौरवण्यात आले. पूर्वाध्यक्ष असताना संस्कार भारतीच्या माध्यमातूनही त्यांनी अत्यंत उल्लेखनीय असे कार्य केले आहे. या कार्यक्रमात दोन्ही सन्मानित मान्यवरांचे अनुभव, कार्य आणि विचार यावर आधारित विशेष संवाद होणार असून, त्यांच्या कलेतील प्रवासाची प्रेरणादायी झलक प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. चतुरंग प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर हे सुसंवाद साधणार आहेत.

चित्रपट व चित्रकलेतील अनेक दिग्गज या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेते नाना पाटेकर, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेते अरूण नलावडे, अजिंक्य देव, दिग्दर्शक योगेश सोमण, हृषिकेश जोशी, लेखक अभिराम भडकमकर, दिग्दर्शक अभिनय देव, लोकसंस्कृती अभ्यासक व लेखक डॉ. प्रकाश खांडगे, निर्माते अनंत पणशीकर, संस्कार भारतीचे अखिल भारतीय संयोजक अभिजीत गोखले, चित्रकार सुहास बहुळकर अशा अनेक मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. चित्रकला क्षेत्राशी तसेच चित्रपट क्षेत्राशी संबंधित असणाऱ्यांनी त्याचप्रमाणे सर्वसामान्य रसिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संस्कार भारतीच्या वतीने करण्यात येत आहे.

 

टॅग्स :सुनील बर्वेमुंबईमराठी अभिनेता