Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतील ‘त्या’ गावांमध्ये नळजोडणीत अभय योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 05:58 IST

पाणी देयकांचे विलंब शुल्क माफ करून, मूळ पाणीपट्टीची रक्कम तीन मासिक टप्प्यांमध्ये व सहा महिने कालावधीमध्ये भरण्याची अभय योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली आहे.

मुंबई : नवी मुंबई परिसरात सिडको गावांमधील शासकीय नळ जोडणीधारकांच्या पाणी देयकांचे विलंब शुल्क माफ करून, मूळ पाणीपट्टीची रक्कम तीन मासिक टप्प्यांमध्ये व सहा महिने कालावधीमध्ये भरण्याची अभय योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली आहे.सिडको क्षेत्रातील गावे आणि शासकीय नळ जोडणीधारक यांच्याकडील थकीत पाणीपट्टीची रक्कम वसूल करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत होती. यामध्ये काही ग्राहकांकडून थकित रक्कम सिडकोकडे जमा देखील झाली आहे. मात्र अद्यापही काही थकबाकीदारांनी रक्कम भरलेली नाही.नवी मुंबईतील नवीन पनवेल, काळुंद्रे, कळंबोली, नावडे, करंजाडे, कामोठे, खारघर, द्रोणागिरी, उलवे तसेच आजुबाजूची गावे मिळून मार्च २०१८ अखेर ८६.८० कोटी रुपये थकित आहेत. पैकी ग्रामपंचायत व सरकारी कार्यालयांकडे यातील ४२.६१ कोटी रु.रक्कम थकित आहे. पैकी १६.७८ कोटी रु. विलंब शुल्क आहे. तर २५.८३ कोटी ही मूळ रक्कम आहे.दरम्यान, थकित रक्कम भरताना विलंब शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी काही ग्रामपंचायत व सरकारी कार्यालयांनी केली आहे. त्यानुसार सिडको संचालक मंडळाने प्रस्ताव तयार करून त्यास मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.