Join us  

किडनीग्रस्त महिलेच्या कोरोनामुक्तीसाठी सर्व करत होते रोज बाल्कनीच्या खिडकीतून आरती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 5:14 PM

सोसायटीतील एका किडनीग्रस्त महिलेला कोरोना झाला, आणि विशेष म्हणजे सदर महिला कोरोनामुक्त होण्यासाठी सोसायटीच्या सदस्यांनी कुटुंबासह रोज बाल्कनीच्या खिडकीतून सामुदायिक आरती केली.

 

मनोहर कुंभेजकर

मुंबई : कोरोना रुग्ण सोसायटीत आढळल्यास तेथील परिसर हा लॉकडाऊन केला जातो, आणि त्याची झळ तेथील नागरिकांना बसते. मात्र सोसायटीतील एका किडनीग्रस्त महिलेला कोरोना झाला,आणि विशेष म्हणजे सदर महिला कोरोनामुक्त होण्यासाठी सोसायटीच्या सदस्यांनी कुटुंबासह रोज बाल्कनीच्या खिडकीतून सामुदायिक आरती केली. आणि विशेष म्हणजे सदर महिला कोरोनामुक्त होवून नुकतीच सुखरूप घरी परतली. सदर घटना ही गोरेगाव (पूर्व) येथील आहे. संस्थेच्या सामुदायिक आरतीला यश येऊन आणि आमची महिला सदस्य घरी परतल्याने येथील नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. टाळ्या वाजवून नागरिकांनी या महिलेचे स्वागत केले. सोसायटीचे अध्यक्ष युवराज गायकवाड यांनी या शुभवर्तमानाची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लॉकडाऊनच्या काळात देशवासियांना बाल्कनीच्या खिडकीतून येवून थाळी नाद करणे,दिवे लावण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला देशवासियांनी चांगला प्रतिसाद दिला होता.त्यामुळे आमची महिला सदस्य कोरोनामुक्त होण्यासाठी आम्ही सर्व १६८ सभासदांनी रोज ७.३० वाजता बाल्कनीच्या खिडकीतून आरती करण्याचा निर्णय घेतला, याला येथील नागरिकांनी व त्यांच्या कुटुंबियानी चांगला प्रतिसाद दिला, असे गायकवाड व अध्यक्ष रणजीत  कदम यांनी सांगितले. येथील सोसायटीत दि, १ मे रोजी येथील महिला सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळली.बृहन्मुंबई महानगर पालिकेने येथील ई विंग ताळेबंद केली होती.सदर महिला किडनीग्रस्त होती आणि तिचे डायलिसिस सुरू होते.त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाब सुद्धा होता.त्यात त्यांना कोरोनाची लागण झाली. संस्थेच्या सर्व सभासदांनी रोज संध्याकाळी 7:30 वाजता देवाची आरती करणे सुरू केले. सर्व सभासद आपापल्या खिडकीतून आरती ला सहभाग घेत असत.अखेर आमच्या सर्व सभासदांनी श्रद्धेने केलेल्या सामुदायिक आरतीला यश आले आणि या महिलेला कोरोनामुक्त केले. १४ मे रोजी सदर महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.सर्व संस्थेच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण झाले. त्यामुळे कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. हा आजार बरा होतो फक्त इच्छा शक्ती असली पाहिजे.आणि देवा चे नामस्मरण सातत्याने घेतलें पाहिजे.कसलं ही संकट आपल्यावर येत नाही. हे आमच्या गृहनिर्माण सोसायटीचे उदाहरण आहे असे युवराज गायकवाड यांनी शेवटी अभिमानाने सांगितले.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस