Join us  

आरे कॉलनी जंगलातील जमिनीसाठी आग लावल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 6:03 AM

गोरेगावातील आरे कॉलनीतील जंगलाला सोमवारी लागलेली आग विझली असली तरी आता यातून संशयाचा धूर उठण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई : गोरेगावातील आरे कॉलनीतील जंगलाला सोमवारी लागलेली आग विझली असली तरी आता यातून संशयाचा धूर उठण्यास सुरुवात झाली आहे. आरेच्या डोंगर परिसरात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. मात्र, या आगी लागत नसून त्या जाणूनबुजून लावल्या जात आहेत. तसेच आरेच्या जंगलातील जमीन मिळावी म्हणून आग लावण्याचे हे षड्यंत्र सुरू असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे.डोंगर परिसरात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी येथे आग लागल्याची घटना घडली होती. तेव्हा स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले होते.मात्र, या आगी लागत नसून त्या लावल्या जात असल्याचा दाट संशय आहे, असे वनशक्तीचे प्रकल्प संचालक डी. स्टॅलिन यांनी सांगितले. तसेच या आगींवर नियंत्रण मिळत असले तरी त्या सारख्या का लावल्या जातात, याची तातडीने चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.दिंडोशी येथील न्यू म्हाडा कॉलनी येथील मागील बाजूस असलेल्या व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हिरवळीने नटलेल्या डोंगराला अनेकदा आग लावण्यात येत असल्याचा आरोप पर्यावरणवादी झोरू बथेना यांनी केला. दरवर्षी येथे आग लावण्याच्या घटना घडत आहेत. या आगी लावल्यामुळे येथील सर्व निसर्गच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आपणच निसर्गाला वाचवले नाही तर मुंबईत जो काही थोडाफार हिरवळीने समृद्ध निसर्ग उरला आहे तोही आगीच्या भक्षस्थानी जाण्यास वेळ लागणार नाही. याचा दुष्परिणाम पुढे आपल्यालाच सहन करावा लागेल. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.गोरेगावातील आरे कॉलनीतील डोंगराला दरवर्षी आग लावून संपूर्ण वनराई नष्ट केली जात असल्याचा आरोप पर्यावरणवादी अमृता भट्टाचार्य यांनी केला आहे. येथील ३० टक्के डोंगर अगदी करवतीप्रमाणे कापला असून वनसंपत्तीचा, पर्यायाने पर्यावरणाचादेखील नाश करून येथील वनसंपत्ती नष्ट केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.>‘चौकशी होत नाही’आगीमुळे येथील स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आगीवर नियंत्रण मिळवले जात असले तरी त्या आपणहून लागतात की लावल्या जातात याची चौकशी होताना दिसत नाही. त्यामुळे यात नक्कीच काही तरी काळेबेरे असल्याचा संशय डी. स्टॅलिन, झोरू बथेना यांच्यासह अनेक पर्यावरणवाद्यांनी केला आहे.

टॅग्स :आरेआग