Join us  

आरेतील वृक्षतोडीचे पाप भाजपसह सरकारचे, आदित्य ठाकरेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 1:32 AM

मुंबई महापालिकेत व राज्यातही सत्तेत असलेली शिवसेना आरेमधील ही झाडे का वाचवू शकली नाही? असे म्हणून ‘आरे कोण रे?’ असे प्रश्न निवडणूक प्रचारात उपस्थित केले जात आहेत.

मुंबई : ‘मेट्रो-३’च्या कारशेडसाठी आरे दुग्ध वसाहतीमधील २,७०० झाडांची निर्दयपणे कत्तल केल्या जाण्याच्या पापास भारतीय जनता पक्ष, राज्य सरकार व मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन हेच सर्वस्वी जबाबदार असून शिवसेनेने मात्र कायम ही झाडे वाचविण्याचीच ठाम भूमिका घेऊन आपल्या अधिकारात त्याला शक्य तेवढा विरोध केला, असा दावा युवासेनेचे अध्यक्ष व वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेत व राज्यातही सत्तेत असलेली शिवसेना आरेमधील ही झाडे का वाचवू शकली नाही? असे म्हणून ‘आरे कोण रे?’ असे प्रश्न निवडणूक प्रचारात उपस्थित केले जात आहेत. त्याला सविस्तर उत्तर देणारा ब्लॉग आदित्य ठाकरे यांनी लिहिला आहे. यात त्यांनी प्रामुख्याने तीन आरोपांचा समाचार घेतला आहे. एक, महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असल्याने वृक्षतोडीस शिवसेना जबाबदार आहे. दोन, राज्याचे पर्यावरण खाते स्वत:कडे असूनही काहीही न करता शिवसेना विरोधाचे केवळ राजकारण करत आहे. तीन, ज्या वृक्ष प्राधिकरणाने वृक्षतोडीस मंजुरी दिली ते शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेचे आहे.

आदित्य ठाकरे यांनी लिहिले की, मुंबईच्या २०३४ पर्यंतच्या प्रस्तावित विकास आराखड्यात आरे वसाहत ‘ना विकास क्षेत्र’ होते. त्यात बदल करून कारशेडची ही जागा त्यातून वगळण्याचा प्रस्ताव आला तेव्हा महापालिकेने यास नकार दिला. मात्र नगरविकास खात्याने हा बदल मंजूर केला. त्या खात्याशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. राज्याचे पर्यावरण खाते शिवसेनेकडे असले तरी आरे वृक्षतोडीच्या विषयाशी या खात्याचा एकदाही सूतराम संबंध आला नाही, असेही त्यंनी म्हटले आहे.‘संसदेत, राज्य विधिमंडळात सातत्याने केला विरोध’वृक्ष प्राधिकरणात सहा सदस्यांसह शिवसेनेचे बहुमत होते तोपर्यंत प्राधिकरणाने हा वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर होऊ दिला नाही. मात्र नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार प्राधिकरणावर पाच तज्ज्ञ सदस्य म्हणून नेमले गेले. त्यानंतर जेव्हा या प्रस्तावावर घाईघाईने मतदान घेण्यात आले तेव्हा शिवसेनेच्या सहाही सदस्यांनी त्यास विरोध केला. काँग्रेसच्या दोन सदस्यांनी सभात्याग केला. त्यामुळे शेवटी पाच तज्ज्ञांपैकी तिघे, भाजपचे चार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव सदस्याने वृक्षतोडीच्या बाजूने मतदान केल्याने तो ठराव आठविरुद्ध सहा अशा बहुमताने मंजूर झाला. याखेरीज शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी संसदेत व राज्य विधिमंडळात या वृक्षतोडीस सातत्याने विरोध केला, असेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

टॅग्स :आदित्य ठाकरेआरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019