अंगणवाड्यांना गरज जागांची
By Admin | Updated: January 29, 2015 23:21 IST2015-01-29T23:21:00+5:302015-01-29T23:21:00+5:30
भिवंडी महानगरपालिका हद्दीत दिवसेंदिवस लोकसंख्या झपाट्याने वाढत असून शहरात सुरू झालेल्या विकासकामांमुळे,

अंगणवाड्यांना गरज जागांची
पंढरीनाथ कुंभार, भिवंडी
भिवंडी महानगरपालिका हद्दीत दिवसेंदिवस लोकसंख्या झपाट्याने वाढत असून शहरात सुरू झालेल्या विकासकामांमुळे, लहान मुलांवर शिक्षणाचे प्राथमिक सोपस्कार करणाऱ्या आणि बाल-मातांना आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी भरविण्यासाठी जागा मिळत नसल्याने त्यांच्यासमोर नवनवीन समस्या उभ्या राहत आहेत. त्यामुळे शहरात त्या भरविण्यासाठी महानगरपालिकेने ठिकठिकाणी जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आता होऊ लागली आहे़
डहाणूत अनुताई वाघ यांनी आपल्या अंगणात लहान मुलांसाठी अंगणवाडी भरवून त्यांच्यात शाळेची व शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे प्रयत्न केले. त्याच धर्तीवर केंद्र सरकार राज्यातील गावागावांत व शहरांत अंगणवाडी प्रकल्प राबवून बालवयातील मुलांवर शाळेचे संस्कार करीत आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मुले व त्यांच्या मातांना आरोग्य सुविधा पुरवून मुलांचे कुपोषण थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सध्याच्या ब्लॉक संस्कृतीने घरापुढील अंगणच कालबाह्य झाल्याने अंगणवाडी भरविण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे जागेची मागणी केली आहे. सध्या शासन देत असलेल्या तुटपुंज्या भाड्यात अंगणवाडीसाठी कोणी जागा देण्यास तयार होत नाही. सेविकांवर नवनवीन जबाबदाऱ्या सोपवून शासन काम वाढवित असल्याने इतर भारही वाढत आहे.