Join us

बचत गटातील महिलेने सुतारकामातून सुरू केला 'एथनिक' दागिन्यांचा उद्योग 

By सीमा महांगडे | Updated: January 16, 2025 12:48 IST

महापालिकेच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी बनवलेली लाकडाची एथनिक ज्वेलरी आता विविध प्रदर्शन, मेळाव्यात लोकप्रिय ठरू लागली आहे.

 - सीमा महांगडे 

मुंबई : सुतारकामात सामान्यतः पुरुषांची मक्तेदारी असते. मात्र भाकरीला गोल आकार द्यावा तितक्याच सहजपणे गायत्री त्रिमुखे यांनी हे कौशल्य मिळवून कुटुंबाला आधार दिला आहे. महापालिकेच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी बनवलेली लाकडाची एथनिक ज्वेलरी आता विविध प्रदर्शन, मेळाव्यात लोकप्रिय ठरू लागली आहे. 

मुंबईच्या कुर्ला कमानी भागातील गीता त्रिमुखे यांनी पतीला सुतारकामाच्या व्यवसायाला हातभार लावतानाच स्वतः लाकडाच्या ज्वेलरी मेकिंगचा व्यवसाय उभारण्याचाही निर्णय घेतला. त्यासाठी पारंपरिक तंत्रज्ञानाला त्यांनी आधुनिकतेची जोड दिली. त्यासाठी त्यांना साथ मिळाली ती पालिकेच्या महिला बचतगट मोहिमेची. त्यातून त्यांना व्यवसाय उभारणीसाठी निधी मिळालाच, पण उत्पादीत केलेल्या लाकडी ज्वेलरीला प्रदर्शन, मेळाव्याचे व्यासपीठही उपलब्ध झाले. 

तेथील प्रतिसादामुळे त्यांना हुरूप आल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या बाजारात एथनिक ज्वेलरी म्हणून लाकडाच्या दागिन्यांना प्रचंड मागणी आहे. त्यातही बांगड्या, पाटल्या, नेकलेस, कानातले दागिने अशा विविध उत्पादनांना महिला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो, असे त्यांनी सांगितले. 

चित्रफिती देणार प्रेरणा पालिकेच्या नियोजन विभागाकडून महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध व्यासपीठे खुली करून देण्यात येत आहेत. शिवाय ऑनलाईन विक्रीचाही पर्याय उपलब्ध करण्यात आल्याने या महिलांना रोजगार मिळू लागला आहे. गटांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन बैंक कर्जाची सुविधाही दिली जाते. बचत गटाच्या प्रेरणादायी ठरणाऱ्या यशोगाथा आता चित्रफितींद्वारे इतर महिलांना दाखवल्या जात आहेत.

पालिकेकडून अर्थसाहाय्य पालिकेकडून २०१४ पासून आतापर्यंत तब्बल ८ ते ९ हजार महिला बचत गटांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास ७ हजार गटांनी अधिकृत नोंदणी केली असून ते पालिकेच्या अर्थसाहाय्यासाठी पात्र ठरले आहेत. प्रत्येक महिला बचत गटाला पालिकेकडून किमान २५ हजारांचे अर्थसाहाय्य दिले जात असून, त्यासाठी बचत गटात किमान १० सदस्य असणे आवश्यक असते. त्यापैकीच जिजामाता महिला बचत गटाच्या गीता त्रिमुखे या सदस्य आहेत.

टॅग्स :मुंबई