Join us

मुंबईत नाल्यांतील गाळ काढण्यासाठी तब्बल ३९५ कोटींची निविदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 14:24 IST

मुंबई महापालिकेने शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांतील नाल्यांतील गाळ काढण्यासाठी जवळपास ३९५ कोटी

मुंबई

मुंबई महापालिकेने शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांतील नाल्यांतील गाळ काढण्यासाठी जवळपास ३९५ कोटी, तर मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी ९६ कोटींची निविदाप्रक्रिया सुरू केली आहे. या निविदांना प्रतिसाद मिळाल्यास फेब्रुवारीपर्यंत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन मार्चपासून नालेसफाईला सुरूवात होण्याची शक्यता आहे. 

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून मोठ्या नाल्यांची, तर विभाग कार्यालयांच्या स्तरावर लहान नाल्यांची सफाई केली जाते. पावसाळ्यापूर्वी ७५ टक्के, पावसाळ्यात १५ टक्के आणि पावसानंतर १० टक्के अशी तीन टप्प्यांत ही नालेसफाई केली जाते. मागील वर्षी गाळ उपसण्यासाठी पालिकेने ३१ कंत्राटदार नेमले होते. या कामासाठी पालिकेने २४९.२७ कोटी खर्च केले होते. 

परंतु, मागील वर्षी अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी तुंबले होते. यंदा नाल्यांतील गाळ काढण्यासाठी जानेवारीच्या अखेरीस निविदा मागवल्या असून वेळीच प्रक्रिया पूर्ण झाल्यास पावसाळापूर्वी सफाईचे लक्ष्य गाठण्यात यश येईल, असा विश्वास पर्जन्य जलवाहिन्या विभागाने व्यक्त केला आहे. 

मिठी नदीसाठी ९६ कोटी रुपयांची तरतूद१. सप्टेंबर २०२४ मध्ये मुसळधार पावसात मिठी नदीने सर्वाधिक ३.६० मीटर पातळी (४.२० अंतिम पातळी) गाठली होती. २. त्यामुळे लगतच्या झोपडीधारकांना अन्यत्र स्थलांतरित करावे लागले. त्यामुळे मिठी नदीच्या पुरुज्जीवनाची आणि विकासाची चर्चा पुन्हा सुरु झाली. ३. यंदा मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी ९६ कोटींची निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा तीन टप्प्यांत काढण्यात येणार आहे. अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली. 

३०९ मोठे नालेमुंबईत ३०९ मोठे, १ हजार ५०८ छोटे नाले, तसेच रस्त्यांच्या कडेला एक हजार ३८० गटारे आहेत. त्याचबरोबर ५ नद्यांमधून पावसाचे पाणी समुद्रात जाते.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका