Join us

एकच मागणी; आमचा उमेदवार मराठीच हवा; पक्ष कोणताही असो, आमचा उमेदवार पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 11:35 IST

आगामी काळात हा नारा आणखी बुलंद होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

मुंबई : आता फक्त एकच मागणी, पक्ष कोणताही असो, आमचा उमेदवार मराठीच पाहिजे. ना कोणत्या जातीसाठी, ना कोणत्या पक्षासाठी आम्ही एकजूट आहोत, मराठी भाषेसाठी... हा नारा आता खणखणीत वाजू लागला आहे. आगामी काळात हा नारा आणखी बुलंद होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. निवडणुकीच्या काळात तर हा नारा आणखी टिपेला पोहोचेल असे दिसते.

मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीने निवडणुकांमध्ये मराठी उमेदवारांचाच आग्रह धरला आहे. त्यासाठी समितीने ठिकठिकाणी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे या मोहिमेला किती प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.

मराठीचा मुद्दा ऐरणीवर

  मुलुंड आणि पश्चिम उपनगरात मराठी व्यक्तींना  घर देण्यास काही अमराठी लोकांनी विरोध केल्यामुळे मराठी माणूस आणि मराठी  हा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला आहे.

  मराठी  माणसाला जागा नाकारणे हे संतापजनक आहे. मराठी माणूस गप्प बसतो म्हणून असे प्रकार होत आहेत, असा सूर उमटू लागला आहे.

महापालिका निवडणुकीत पुन्हा मराठीचा मुद्दा? 

समितीने आतापर्यंत जोगेश्वरी, बोरीवली, मानखुर्द, दहीसर, मीरारोड, लालबाग येथे आयोजित मराठी उमेदवार हवा या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. आगामी निवडणुकांमध्ये विशेष करून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत  ‘मराठी’चा मुदा पुन्ह ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. समितीच्या आंदोलनाला आणखी धार चढल्यास निवडणूक आखाड्यात अधिक रंगत येणार आहे.

मराठी उमेदवारांसाठी स्वाक्षरी मोहीम

गिरगावात स्वाक्षरी मोहीम राबवली होती. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अमराठी मंडळींचा जास्त भरणा असलेल्या  सोसायटीत मराठी माणसाला घर नाकारण्याचे प्रकार होत असतो.

तुम्ही मराठी आहात, मांस -मच्छी खाता, त्यामुळे तुम्हाला आमच्या सोसायटीत घर मिळणार नाही, असे बेधडकपणे सांगितले जाते, असा अनुभव काहींनी सांगितला.

परराज्यात स्थानिकांच्या हक्काला प्राधान्य दिले जाते. दक्षिणेकडील राज्यात तर त्यांच्या भाषेव्यतिरिक्त अन्य भाषा बोलली जात नाही. मुंबईत मात्र मराठी माणूस आणि मराठी भाषेची  अवहेलना करण्याचे धाडस  दाखवले जाते. हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.