'नृत्यकला निकेतन'च्या १५० व्या अरंगेत्रमची विक्रमी नोंद; मुंबईतील संस्थेला बहुमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2023 14:52 IST2023-11-30T14:52:22+5:302023-11-30T14:52:31+5:30
जुलै २०२३ मध्ये गुरु अर्चना पालेकर यांना त्यांच्या भरतनाट्यम क्षेत्रातील ४१ वर्षांहून अधिक कारकिर्दीतील उल्लेखनीय योगदान तसेच भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याच्या प्रचार आणि प्रसाराबद्दल 'मदर इंडिया' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

'नृत्यकला निकेतन'च्या १५० व्या अरंगेत्रमची विक्रमी नोंद; मुंबईतील संस्थेला बहुमान
मुंबई - दर्जेदार भरतनाट्यम् नृत्यांगना घडविणाऱ्या 'नृत्यकला निकेतन' च्या १५० व्या अरंगेत्रमचे सादरीकरण गिरगावच्या साहित्य संघ मंदिर येथे झाले. या अरंगेत्रमची नोंद 'वर्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया`मध्ये करण्यात आली. गुरू अर्चना पालेकरांच्या मार्गदर्शनाखाली १५० वे अरंगेत्रम सादर करणारी `नृत्यकला निकेतन' शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण संस्था ही मुंबईतील पहिली संस्था ठरली आहे.
भूमी वहाळकर, धृमी शाह, दिया शाह, ईशा सावंत, माही वाघेला, शैली चौहान आणि शेनश्री रापोझा या विद्यार्थिनींनी अरंगेत्रम सादर केले. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये 'नृत्यकला निकेतन'च्या संचालिका गुरु अर्चना पालेकर, संस्थेच्या आजी गुरु मयुरी खरात, डॉ. मंजूजी लोढा, गुरु सुमित्रा राजगुरु संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थिनी, त्यांचे पालक आणि वर्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी संजय नार्वेकर, सुषमा नार्वेकर यांची उपस्थिती होती.
जुलै २०२३ मध्ये गुरु अर्चना पालेकर यांना त्यांच्या भरतनाट्यम क्षेत्रातील ४१ वर्षांहून अधिक कारकिर्दीतील उल्लेखनीय योगदान तसेच भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याच्या प्रचार आणि प्रसाराबद्दल 'मदर इंडिया' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशात दुग्ध शर्करा योग म्हणजे नृत्यकला निकेतन'च्या १५० व्या अरंगनेत्रमचा जागतिक विक्रम. त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना 'नृत्यकला निकेतन'च्या गुरु अर्चना पालेकर म्हणाल्या, '१९८२मध्ये नृत्यकला निकेतन'ची स्थापना झाली. माझी मुलगी मयुरी खरात ही या संस्थेची पहिली विद्यार्थिनी. तिचेच या संस्थेत पहिले अरंगेत्रम झाले. माझी नात मानसी खरात ही देखील याच संस्थेची विद्यार्थिनी. या संस्थेतील ७० वे अरंगेत्रम तिने केले. आम्ही तिघी नृत्यकला निकेतनच्या विद्यार्थिनींवर जे नृत्याचे संस्कार करीत आहोत, त्यामुळे १५० वा अरंगेत्रमचा सोहळा आमची संस्था पाहत आहे. एका संस्थेतून १५० अरंगेत्रम पूर्ण होणे हा एक प्रकारचा विक्रम आहे. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून संस्था सुरू केली. १५०० पेक्षा अधिक विद्यार्थिनी माझ्या संस्थेतून भरतनाट्यम विशारद झाल्या आहेत. एखाद्या गुरुसाठी यापेक्षा अजून समाधानाची बाब कोणती असणार? मी कृतार्थ झाले आहे."
संस्थेच्या आजी गुरु मयुरी खरात प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या, `नृत्यकला निकेतन'मध्ये अरंगेत्रमच्या परंपरेची सुरुवात माझ्यापासून झाली. त्यानंतर झालेल्या १४९ अरंगेत्रमची मी साक्षीदार आहे. या संस्थेतील माझा विद्यार्थिनी ते शिक्षिकेचा प्रवास प्रगल्भ करून गेला आहे. माझी आई गुरु अर्चना पालेकर हिने आत्तापर्यंत संस्था मोठी करण्यासाठी जी काही मेहनत घेतली आहे, त्याचे फळ म्हणजे आम्ही केलेला हा आजचा विश्वविक्रम. एखाद्या शिक्षिकेसाठी या पेक्षा अजून समाधान ते काय? तरीही आम्हाला अजून मजल मारायची आहे."