Join us
Daily Top 2Weekly Top 5

बूस्टरने पळवा कोरोनाचा नवा व्हेरिएंट; लसीकरण पूर्णत्वाचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 11:02 IST

जनुकीय क्रमनिर्धारण चाचणीत राज्यातील १०५ नमुने एक्सबीबी १.१६ व्हेरिएंटचे आढळले आहेत.

मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे संसर्ग वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी मांडले आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा पालिका प्रशासनाकडून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. आजही मुंबईतील अनेक नागरिकांनी बूस्टरची मात्रा घेतली नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अँटीबॉडीज कमी झाल्याने कोरोना वाढण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर बूस्टर डोस वा लसीकरण पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. 

केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जनुकीय क्रमनिर्धारण चाचणीत राज्यातील १०५ नमुने एक्सबीबी १.१६ व्हेरिएंटचे आढळले आहेत. कोरोना विषाणूमध्ये सातत्याने बदल होत असून, त्याचे उपपक्रार समोर येत आहेत. परिणामी, एन्डेमिक स्थितीत असलेल्या साथीमध्ये होणारे हे बदल सामान्य आहेत. मात्र, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी यंत्रणांनी तयार राहिले पाहिजे. बूस्टरमुळे कोरोना संसर्गाची तीव्रता गंभीर होण्याची शक्यता कमी होते, अशी माहिती कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे.

कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात १६ ते २४ मार्चदरम्यान २ हजार २११ कोरोना रुग्ण आढळले आहेत. ही वाढ मार्चच्या दुसऱ्या आठवड्याच्या तुलनेत तिपटीपेक्षा अधिक आहे. या काळात दररोज २०० पेक्षा अधिक रुग्ण नोंद आहे. २२ व २४ मार्च रोजी कोरोना रुग्णांच्या संख्येने तीनशेचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन १७६३  झाली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोनाची लस