Join us

नव्या धारावीत उभारणार मैदाने, उद्यानांचे जाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 15:40 IST

धारावीत एकूण २६ शाळा आहेत. यात अनेक शाळा बैठ्या म्हणजे लहान वर्गांत भरतात. बहुतेक शाळांमध्ये स्वतंत्र खेळाचे मैदानही नाही.

मुंबई : नव्या धारावीत म्हणजे धारावी अधिसूचित क्षेत्रात मोठ्या उद्यानांपासून छोट्या खेळाच्या मैदानांपर्यंत परस्पर जोडलेले सार्वजनिक हरित जाळे उभारण्याचे नियोजन आहे. नागरिकांना मोकळ्या जागेत वावरता यावे आणि मुलांनाही खेळाच्या मैदानांवर सुरक्षित खेळता यावे, हे या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. धारावीत एकूण २६ शाळा आहेत. यात अनेक शाळा बैठ्या म्हणजे लहान वर्गांत भरतात. बहुतेक शाळांमध्ये स्वतंत्र खेळाचे मैदानही नाही. त्यामुळे नवीन योजनेत फक्त शैक्षणिक व क्रीडा सुविधांतील सुधारणाच नव्हे तर पालिकेच्या शाळा पुनर्स्थित करण्याचे नियोजन आहे. 

यासाठी प्लेग्रुपपासून १० वीपर्यंतच्या शाळांसाठी नियोजन सुरू आहे. यामध्ये प्रत्येक शाळेला स्वतंत्र खेळाचे मैदान असेल. त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन ते चार खासगी शाळा उभारणीचाही विचार आहे. जे धारावीकर पात्र नाहीत, त्यांना डीएनएच्या बाहेर नव्या वसाहतींमध्ये हलवले जाणार आहे. त्यानंतर लोकसंख्येच्या आधारावर शाळांची संख्या ठरवली जाणार आहे. 

आधुनिकतेकडे पाऊल खेळाची मैदाने, उद्याने आणि मोकळ्या जागा अशा ठिकाणी नियोजनबद्धरीत्या विकसित केली जातील, जेणेकरून सर्व वयोगटांतील नागरिकांना त्याचा लाभ घेता यावा.धारावीतील सध्याची सामाजिक पायाभूत सुविधा अपुरी आणि निकृष्ट आहे. ही संपूर्ण व्यवस्था नव्याने उभारण्याची गरज आहे. नव्या धारावीला  एक आधुनिक शहर बनविण्याच्या दिशेने हे पाऊल आहे. 

सर्व वयोगटांसाठी खेळाची मैदाने, उद्याने आणि मोकळी मैदाने.प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्र खेळाचे मैदान हरित पट्ट्यातून पर्यावरणीय समतोल.