कला संस्कृती, योगेश बिडवई, मुख्य उपसंपादक
नवे वर्ष नाट्यरसिकांसाठी विविध आशय-विषयांची नाटके रंगभूमीवर घेऊन आले आहे. साहित्य, नाटक, सिनेमा, संगीत या कलांना भाषा, प्रांताची बंधने नसतात. विशेषत: मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात तर विविध भाषांतून अनुवाद केलेल्या हिंदी, मराठी, इंग्रजीतील प्रयोगशील नाट्यकृती पाहण्यास रसिक उत्सुक असतात. अ. भा. मराठी नाट्य परिषदेने चाकोरीबाहेर जाऊन नुकताच देशातील विविध भाषिक नाटकांचा महोत्सव आयोजित केला. त्यात मांडणी, सादरीकरणाची प्रयोगशीलता होती. आदित्य बिर्ला ग्रुप इनिशिएटिव्हच्या सातव्या सीझनमधील दुसरी निर्मिती असलेले आद्यम थिएटरचे रसिकांच्या भेटीला आलेले ‘चांदनी रातें’ हे हिंदी संगीतमय नाटक असेच लक्ष वेधून घेत आहे. आरंभ प्रॉडक्शनची निर्मिती असलेले हे नाटक आशय, त्याच्या भन्नाट सादरीकरणामुळे चर्चेत आहे.
कथा, कविता, नाटक, कादंबरी आदी प्रकारांतून माणसाची सर्जनशीलता व्यक्त होते. साहित्याच्या या प्रकारांतून प्रेम, राग, सुखदु:ख, असूया आदी भावभावना, मानवी नातेसंबंध, त्यातील तरलता शब्दांच्या माध्यमांतून प्रकट होते. प्रख्यात रशियन लेखक फ्योदर दोस्तएव्हस्की यांच्या १८४८मधील व्हाइट नाइट्स या लघुकथेचा चांदनी रातें हा संगीतमय भारतीय रूपातील नाट्याविष्कार असाच तुम्हाला खिळवून ठेवतो.
एफटीआयआयमधून सिनेमाचे शिक्षण घेतलेल्या लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्री असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या पूर्वा नरेश यांनी अत्यंत काव्यात्मक पद्धतीने रशियन कथेचे भारतीय नाट्यरूपांतर केले आहे. या कथेवर जगभरातील ११ दिग्दर्शकांनी चित्रपट (संजय लीला भन्साळी दिग्दर्शित - सावरिया) बनविलेले आहेत. पडदा उघडतो तोच फ्योदर दोस्तएव्हस्की यांच्या कथेनुसार रंगमंचावर रशियातील सेंट पिटर्सबर्ग या शहरातील नदी आणि पूल अवतरतो आणि प्रेक्षक एका वेगळ्याच जगात प्रवेश करतात. त्यानंतर हे दोन अंकी नाटक गाणी, संगीत (संगीतकार - कैजाद घेर्डा) तसेच सतत बदलणाऱ्या रंगमंचाने, त्यातील अद्भुत नेपथ्याने (नेपथ्य - कुशाल महंत) तुम्हाला खिळवून ठेवते. नाटकातील पात्रे रशियन असली, काही शब्द आणि वाक्ये रशियन असली तरी त्याचा आस्वादक म्हणून आपल्याला अडथळा येत नाही.
आपल्या प्रियकराची वाट पाहणारी नेस्तेंका ही तरुणी (गिरिजा ओक) आणि एकाकी, निराशेत असलेला, कविता करणारा दीवाना (मंत्र मुग्ध) यांची ही उन्हाळ्यातील चार चांदण्या रात्रीची (व्हाइट नाइट - उन्हाळ्यात सेंट पिटर्सबर्ग येथे रात्री उशिरापर्यंत सूर्य मावळत नाही) कथा आहे. १७५ वर्षांनंतरही आजच्या पिढीला ती भावते. प्रेम म्हणजे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या गोष्टी. कधी कधी प्रेमात गमावल्यासारखे वाटू शकते. परंतु, ही कथा आपल्याला आठवण करून देते की, प्रेम ही एकच गोष्ट तुम्हाला सकारात्मक विचार करायला लावते. नेस्तेंका आणि दीवाना यांच्या पहिल्या भेटीतील संवाद ऐकण्यासारखे आहेत. बटाट्याचे भाव घसरल्याने एकीकडे शहरात लोक समाधानी आहेत, तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने दीवाना चिंतेत आहे.
माझ्या दिवंगत मित्राची ही कविता असून ती प्रकाशित व्हावी, अशी त्याची शेवटची इच्छा होती, असे सांगत दीवाना स्वत:च्या कविता विविध नियतकालिकांत छापून आणतो. भारतीय पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सेंट पिटर्सबर्ग येथील एका भारतीय बारमध्ये ही कथा आकार घेते. त्यात लाइव्ह बँड आहे. अभिनेता मंत्र मुग्ध व अभिनेत्री गिरिजा ओक यांच्या अप्रतिम अभिनयाने हे नाटक सजले आहे. नताशा (शिम्ली बासू), बेकायदा मार्गाने रशियात आलेला तिचा प्रियकर (कौस्तव सिन्हा) यांनीही उत्तम भूमिका केल्या आहेत.