Join us

वर्सोव्यात आधुनिक फिशिंग हार्बर; एमएमबीकडून प्रस्ताव सरकारकडे सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 10:02 IST

आता मुंबईमध्ये आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे फिशिंग हार्बर (मासेमारी बंदर) उभे राहणार आहे.

अमर शैला, मुंबई : आता मुंबईमध्ये आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे फिशिंग हार्बर (मासेमारी बंदर) उभे राहणार आहे. वर्सोवा येथे सुमारे १९ हेक्टर क्षेत्रावर मासेमारी बंदर उभारण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) या बंदरचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्याला मान्यता मिळताच बंदराच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

सद्यस्थितीत मुंबईत ससून डॉक, भाऊचा धक्का ही मोठी मासेमारी बंदरे आहेत. या भागात दरदिवशी मोठ्या प्रमाणात मासळी येते. मात्र, ही बंदरे जुनी झाली असून तेथे सुविधांचाही अभाव आहे. वर्सोवा येथेही मोठ्या संख्येने मासेमारी व्यवसाय चालतो. या भागात सुमारे ५ हजार मच्छीमारांकडून मासेमारी केली जाते. दरवर्षी सुमारे ४५ हजार टन माशांचे उत्पादन येथे येते. मात्र, वर्सोवा येथे सद्यस्थितीत केवळ एकच जेट्टी आहे. या जेट्टीवरही मच्छीमारांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. त्यातून या भागात नवीन जेट्टी उभारण्याची गरज निर्माण झाली होती. त्यानुसार एमएमबीकडून आता वर्सोवा येथे फिशिंग हार्बर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

या सुविधा उभारल्या जाणार- 

१) अत्याधुनिक लिलाव गृह

२) बोट रिपेरिंग यार्ड

३) आइस प्लँट

४) बोटींसाठी रेडिओ कम्युनिकेशन टॉवर

५) मासे साठवणुकीसाठी जागा

६) बोटी उभ्या करण्यासाठी पार्किंगची सुविधा

७) पावसाळ्यात वादळापासून बोटींचे रक्षण होण्यासाठी ब्रेक वॉटर

टॅग्स :मुंबईवर्सोवाराज्य सरकार