सेंट जॉर्जमध्ये पुढच्या महिन्यात पुरुषाची होणार बाई, लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी आणखी तीन जण प्रतीक्षेत

By संतोष आंधळे | Published: January 20, 2024 06:40 AM2024-01-20T06:40:00+5:302024-01-20T06:46:56+5:30

काही पुरुषांना आपण महिला असल्याचे जाणवत असते, तर काही महिलांना पुरुष असल्याचे वाटत असते.

A man will become a woman next month in St George, with three more waiting for gender reassignment surgery | सेंट जॉर्जमध्ये पुढच्या महिन्यात पुरुषाची होणार बाई, लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी आणखी तीन जण प्रतीक्षेत

सेंट जॉर्जमध्ये पुढच्या महिन्यात पुरुषाची होणार बाई, लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी आणखी तीन जण प्रतीक्षेत

मुंबई : गेल्या काही वर्षांत वैद्यकीय विश्वात झालेल्या प्रगतीमुळे लिंगबदलाच्या शस्त्रक्रिया यशस्वी होऊ लागल्या आहेत. खासगी रुग्णालयांत या शस्त्रक्रियेला ८ ते १० लाख रुपये खर्च येतो. मात्र, शासकीय रुग्णालयांत कमी खर्चात या शस्त्रक्रिया होतात.

अशा शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी जे. जे. समूह रुग्णालयात चार जण प्रतीक्षेत आहेत. यापैकी एका ३० वर्षांच्या पुरुषावर पुढील महिन्यात सेंट जॉर्जेस रुग्णालयात लिंगबदल शस्त्रक्रिया होणार आहे.  

काही पुरुषांना आपण महिला असल्याचे जाणवत असते, तर काही महिलांना पुरुष असल्याचे वाटत असते. त्यामुळे या व्यक्ती लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढे येत असतात. लिंगबदल शस्त्रक्रिया या अशा तत्काळ केल्या जात नाहीत. 

  ...अशी असते प्रक्रिया
- लिंगबदल करण्याची इच्छा असणाऱ्यांचे दोन मानसोपचारतज्ज्ञांकडून समुपदेशन केले जाते.
- मानसोपचारतज्ज्ञांनी प्रमाणपत्र दिल्यानंतर ज्या पुरुषाला महिला व्हायचे आहे, त्याला महिलेचे कपडे परिधान करून काही दिवस राहावयास सांगितले जाते. 
- ज्या महिलेला पुरुष व्हायचे आहे, तिला पुरुषाचे कपडे परिधान करावयास सांगतात. 
- त्यानंतर एका विशिष्ट टप्प्यानंतर हार्मोन्स थेरपीसाठी एंडोक्रायनोलॉजिस्ट यांच्याकडे इच्छुकांना पाठविले जाते. 
 - पुरुषांमध्ये काही वेळा छातीची शस्त्रक्रिया (ब्रेस्ट इम्प्लांटेशन) करावी लागते अन्यथा हॉर्मोन्स थेरपीमुळे पुरुषांमध्येही महिलेसारखी छाती तयार होते. 
- तर महिलांमध्ये ज्यांना  पुरुष व्हायचे आहे, त्यामध्ये त्यांची छाती काढली जाते. वैद्यकीय भाषेत त्याला मॅस्टेक्टॉमी म्हणतात. 

- अंतिम शस्त्रक्रिया लिंगबदलांशी संबंधित असते. त्यामध्ये काही वेळा प्लास्टिक सर्जन आणि मूत्रपिंड विकारतज्ज्ञ (युरोलॉजिस्ट) एकत्र मिळून किंवा स्वतंत्रपणे शस्त्रक्रिया करतात.
- यामध्ये ज्या पुरुषाला महिला व्हायचे आहे, त्याची शस्त्रक्रिया करून पुरुषी लिंग काढून त्या ठिकाणी कृत्रिम योनी तयार केली जाते. 
 - तर महिलांमध्ये ज्या महिलेला पुरुष व्हायचे आहे, तिचे गर्भाशय काढून टाकले जाते. तसेच हातावरील किंवा पायाच्या मांडीवरील स्नायूंच्या साहाय्याने कृत्रिम पुरुषी लिंग तयार केले जाते.           

लिंग बदल शस्त्रक्रिया करण्यासाठी विविध टप्प्यातून जावे लागते. अंतिम शस्त्रक्रिया कारण्याअगोदर किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी जातो. ते सर्व टप्पे पार केल्यानंतरच रुग्णालय प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर लिंग बदल शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. जी लिंग बदल शस्त्रक्रिया पुढच्या महिन्यात करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुरुषाला महिला व्हायचे आहे. त्यामध्ये या पुरुषाला हार्मोन्स थेरपीमुळे त्याची छाती महिलांसारखी झाली आहे. त्यामुळे त्याला त्या शस्त्रक्रियेची गरज नाही.
- डॉ. सागर गुंडेवार, 
सहयोगी प्राध्यापक, प्लास्टिक सर्जरी विभाग, सेंट जॉर्जेस रुग्णालय

Web Title: A man will become a woman next month in St George, with three more waiting for gender reassignment surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.