Join us  

'आज मै मेरा अंतीम संस्कार करता हुं'! असं म्हटलं... आणि त्यानं संपवली आपली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 4:04 PM

मृत्यूच्या दोन तास आधी पत्नीला फोन; लोकलसमोर लॅब असिस्टंटची आत्महत्या

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई: 'आज मै मेरा अंतीम संस्कार कर रहा हुं, तुम तुम्हारा अंतीम संस्कार कर लो', असा मृत्यूच्या दोन तास आधी फोन करत एका लॅब असिस्टंटने लोकलसमोर येत आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार गोरेगाव आणि राम मंदिर परिसरात घडला. त्यानुसार बोरिवली रेल्वे पोलिसांनी यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

मुळचा आझमगडचा रहिवासी असलेल्या या व्यक्तीचे नाव गौतम राय असे आहे.  तो गोरेगाव पूर्व परिसरात त्याच्या पत्नी सोबत राहत होता. त्याच्या पत्नीचे त्याच्या सोबत दुसरे लग्न होते. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास राय हा गोरेगाव आणि राम मंदिर रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर बसलेला सिसिटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्याची पत्नी १५ दिवसांपूर्वी गावी गेली होती. त्यानुसार त्याने सोमवारी आत्महत्या करण्याच्या दोन तासांपूर्वी त्याच्या पत्नीला फोन केला. आज मै मेरा अंतीम संस्कार कर रहा हु, तुम तुम्हारा अंतीम संस्कार कर लो', असा फोन केला. त्यानंतर त्याने स्वतःला लोकलसमोर झोकून दिले. 

त्यानुसार यात कोणत्याही प्रकारचा घातपात नसून राय याची आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाल्याचे बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी 'लोकमत' ला सांगितले. त्याच्या नातेवाईकाना याबाबत कळविण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्याच्या नातेवाईकाचे जबाबही यात नोंदविण्यात आले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कौटुंबिक वादातूनच त्याने हे पाऊल उचलले असावे असे सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत त्याच्या पत्नीचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबईरेल्वे