मुंबई - शहरात पाळीव श्वानाने शेजाऱ्याचा चावा घेतल्या प्रकरणी मॅजेस्ट्रिट कोर्टाने श्वानाच्या मालकाला ४ महिने जेलची शिक्षा सुनावली आहे. त्याशिवाय कोर्टाने कुत्र्याच्या मालकाला ४ हजारांचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी १५ दिवस जेलमध्ये ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. दंडाची रक्कम अंतिम निर्णयानंतर पीडिताला नुकसाई भरपाई म्हणून दिली जाणार आहे.
लिफ्टच्या आत कुत्र्याने घेतला चावा
माहितीनुसार, वरळीतील अल्फा अपार्टमेंटमध्ये एका व्यक्तीला त्याच्या पाळीव श्वानाला नियंत्रित न ठेवल्यामुळे मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून ४ महिने कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना १ फेब्रुवारी २०१८ साली घडली होती. ज्यात रिषभ पटेल नावाच्या व्यक्तीच्या श्वानाने शेजारील रामिक शाह यांचा लिफ्टमध्ये चावा घेतला होता. न्या. सुहास विजय पी भोसले यांनी या प्रकरणी सुनावली घेतली. आरोपीला वारंवार विनंती करूनही त्याने श्वानाला लिफ्टमध्ये घेतले आणि पीडिताच्या अंगावर सोडले. कोर्टाने सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा श्वानाच्या मालकाने लिफ्टमध्ये आधीच असलेल्या व्यक्तीसह दीड वर्षाचा मुलगा आणि कामगार महिलेचाही विचार केला नाही हे दिसून आले.
या घटनेवेळी पीडित व्यक्तीचा दीड वर्षाचा मुलगाही त्यांच्यासोबत होता. आरोपीने जबरदस्तीने श्वानाला लिफ्टमध्ये खेचले, त्यामुळे ना तो श्वानाप्रती संवेदनशील आहे ना इतर लोकांच्या सुरक्षेसाठी सतर्क असं सांगत कोर्टाने आरोपीला फटकारले. या घटनेनंतर पीडित रामिक शाह यांनी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३२४, २८९ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोर्टाने सीसीटीव्ही फुटेज, मेडिकल रिपोर्ट, साक्षीदार यांच्यासह आरोपीवर दोषसिद्ध केले तर बचाव पक्षाने सीसीटीव्ही फुटेजवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दोन्ही बाजूने युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आरोपीवर आयपीसी कलम ३२४ आणि २८९ अंतर्गत दोषी ठरवले मात्र कलम ५०६ अंतर्गत ठोस पुरावे नसल्याने त्यातून निर्दोष केले. कोर्टाने कलम ३२४ अंतर्गत ४ महिने कारावास, ३ हजार दंड आणि कलम २८९ अंतर्गत ३ महिने कारावास आणि १ हजाराचा दंड ठोठावला आहे.