शिवडीत अटल सेतूच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर १० ते १५ फूट खोल भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्याचा भाग थेट खचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रस्ता खचला तेव्हा सुदैवाने कोणतेही वाहन त्यावेळी नव्हते त्यामुळे मोठा अपघात टळला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून बॅरिकेडिंग करुन संबंधित ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
शिवडी स्थानकापासून जवळच बीपीटी रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. याच रस्त्यावरुन पुढे मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर जाता येते. रस्त्याचा भाग मोठ्या प्रमाणात खचल्याने संबंधित रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच याठिकाणी लवकरच नवीन ड्रेन यंत्रणा उभी करुन काम करण्याचे आश्वासन मनपा अधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सध्या याठिकाणी वाहतूक विभागाचे दोन कर्मचारी आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे दोन कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
दरम्यान, हा रस्ता महानगरपालिकेच्या हद्दीतील नसून बीपीटी प्रशासनाच्या अखत्यारितील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून याचे काम तातडीने पूर्ण होणार का? आणि खड्डा बुजवला जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.