नीलेश पाटीलवरिष्ठ उपसंपादक
डोळ्यासमोरून संथ सरकणारी महाविशालकाय जहाजे... समुद्राच्या लाटांची गाज... अशा वेगळ्याच विश्वात घेऊन जाणाऱ्या वातावरण स्थळी तुम्ही हरवलेले असतानाच फ्लेमिंगो, लेसर सँड प्लोव्हर, कर्ल्यू सँडपायपरसारखे देखणे पक्षी नजरेस पडले तर काय होईल? कोणत्याही पक्षिप्रेमीसाठी हे दृश्य नक्कीच अलौकिक असे असेल. पण, बेधुंद करणारा निसर्गाचा हा हिरा मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे, असे सांगितले तर कुणालाही खरे वाटणार नाही. पण, हे वास्तव आहे. पाणजे पाणथळ हा तो खजिना.
गेट वे ऑफ इंडिया येथून दक्षिणेला दिसणारा समुद्र आणि त्याच्या पलीकडे उरणच्या किनाऱ्यावर पाणजे-डोंगरी पाणथळ आहे. तिचे मुख्य क्षेत्र २८९ हेक्टरवर पसरले आहे. आधुनिक जेएनपीए बंदराच्या कुशीतील हे सौंदर्य एकेकाळी म्हणजेच ९० च्या दशकांत तब्बल दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर होते. त्यावेळी लाखोंच्या संख्येने सात पेक्षा अधिक प्रजातींची स्थलांतरित बदके येत होती. वातावरणातील बदल, पाणथळींवर झालेले विकास प्रकल्पांचे अतिक्रमण आणि अन्य कारणांमुळे आता त्यांची संख्या मर्यादित झाली आहे. तरी लिटिल स्टिंट अर्थात छोटा पाणलावा, गुल-बिल्ड टर्न (कुरव चोची सनरे), स्केली-ब्रेस्टेड मुनिया, तिरंगी मुनिया यासारखे एकापेक्षा एक देखणे पक्षी या एकाच ठिकाणी पाहण्याची संधी येथे मिळते.
मार्चपर्यंत निरीक्षणाची पर्वणीआता पावसाळा सरत असताना पुढील महिन्यापासून ही पाणथळी स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे स्वर्ग होणार आहे. मार्चपर्यंत पक्षीनिरीक्षणाची पर्वणी असते. त्यावेळी येथे एकाच वेळी ८००-९०० फ्लेमिंगोंचा विहार पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात. २०१८ मध्ये तब्बल १५ वर्षांनंतर या परिसरात रेड-नेक्ड फॅलरोप प्रजातीचे दोन दुर्मीळ पक्षी दिसले होते. त्यानंतरही अशा अनेक दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन झाले असल्याने हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी नेहमीच सुखद धक्का देणारे ठरते.
का ठरले अनोखे ठिकाण? पाणजे पाणथळ २८९ हेक्टरमध्ये पसरलेले आहे. परंतु, त्यांना अस्तित्व टिकवून ठेवणे भविष्यात कठीण होणार आहे. पक्ष्यांच्या २५० हून अधिक प्रजाती नोंदवल्या आहेत. हिवाळ्यात मोठ्या संख्येने पक्ष्यांचे येथे स्थलांतर होत असे. हे अजूनही आर्क्टिक, रशिया, चीन आणि युरोपच्या काही भागांमधून स्थलांतरितांना आश्रय देत आहे. मुंबई, ठाणे या महानगरांच्या निकटचे अलौकिक स्थान म्हणूनही हे वेगळे ठरत आहे. विशेष म्हणजे अडई, हळदीकुंकू, चक्रवाक तलवार बदक, चक्रांग, थापट्या बदक, भुवई बदक, शाही चक्रवाक, मलिन बदक आणि तरंग अशा विविध प्रजातींच्या बदकांचे येथे दर्शन होते.
Web Summary : Panje wetland near Mumbai hosts 250 bird species, including migratory birds from Arctic, Russia & Europe. A treat for bird watchers, especially in winter, despite habitat loss, offering sightings of rare species.
Web Summary : मुंबई के पास पनजे आर्द्रभूमि आर्कटिक, रूस और यूरोप से आने वाले प्रवासी पक्षियों सहित 250 प्रजातियों का घर है। पक्षी प्रेमियों के लिए एक विशेष स्थान, दुर्लभ प्रजातियों के दर्शन होते हैं।