Join us

सुखसरींत गणरायाचे आगमन! चिंतामणीसह मानाच्या गणपतींच्या ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 13:49 IST

करी रोड, चिंचपोकळी पुलांवर मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: संततधारेत लालबाग, परळ परिसरातील कार्यशाळांतून मुंबईतील मानाच्या गणपतींच्या आगमन मिरवणुका  रविवारी  मोठ्या उत्साहात काढण्यात आल्या. चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा, उमरखाडीचा राजा, गिरगावचा राजा, लोअर परळचा लाडका या बाप्पांसह काही मानाच्या मंडळांच्या मूर्तींची मिरवणुका ढोल-ताशा, लेझीम, बॅंडबाजाच्या गजरात पार पडल्या.

लालबाग-परळ भागातील रस्त्यांवर भक्तांची मोठी गर्दी झाली होती. रस्त्यावरून ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमले. गणेशोत्सवाला अवघे १० दिवस उरले असल्याने मोठ्या गणेश मूर्तींचे आगमन करण्यासाठीचा रविवार महत्त्वाचा ठरला.

गणेश मूर्तींचे आगमन होत असतानाच मंडपातील सजावटीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मंडपांमध्ये प्रकाशयोजना, आकर्षक देखावे यांच्यावर अखेरचा हात फिरविला जात आहे. दरम्यान, रविवार सुटीचा दिवस असल्याने हजारो भाविकांनी संततधारेत बाप्पांच्या आगमन सोहळ्याला हजेरी लावली.

दिवसभरात १६० मूर्तींचे आगमन

मुंबईमध्ये सुमारे १६० पेक्षा जास्त मोठ्या गणेश मूर्तींचे आगमन एका दिवसात झाले. यात चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा, उमरखाडीचा राजा, गिरगावचा राजा, लोअर परळचा लाडका, मुंबादेवीचा गणराज, खेतवाडीचा महाराजा, काळाचौकीचा महाराजा,  कुलाब्याचा लाडका, बाप्पा खेतवाडीचा, अँटॉपहिलचा महाराजा, सायनचा इच्छापूर्ती,  दादरचा विघ्नहर्त, आदी मंडळांच्या गणेश मूर्तींचे आगमन झाले.

करी रोड, चिंचपोकळी पुलांवर मांदियाळी

आगमन सोहळा सुरक्षिततेने पार पाडता यावी यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक पोलिसांनी काही मार्ग बदलले होते. करीरोड, भोईवाडा, दादर आणि भायखळा भागातून लालबाग - परळच्या दिशेने येणाऱ्या मार्गिका बंद करण्यात आल्या होत्या, तर काही मुख्य रस्त्यांवर वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली. करीरोड, चिंचपोकळी पुलांवरून वाहतूक बंद केल्याने या दोन्ही पुलांवर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.

टॅग्स :गणेशोत्सव 2024मुंबई