लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी मुंबई महापालिकेने उत्पन्न वाढीचे स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने पालिकेने पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा निर्णय घेतला असून, दहिसर टोलनाक्यावरील मोकळ्या जागेत १३१ खोल्या असलेल्या हॉटेलचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे.
सध्या या जागेवर ट्रक टर्मिनसचे आरक्षण असून, येथे १९ मजली पंचतारांकित हॉटेलसह या जागेवर वाहतूक व व्यावसायिक केंद्रही उभारले जाणार आहे. येथे इमारत क्रमांक १ व २ मध्ये ४५६ बस पार्किंग आणि १४२४ लहान वाहन पार्किंगची सुविधा उभारण्यात येतील. हॉटेल उभारतानाच व्यावसायिक गाळे व कार्यालये भाड्याने देऊन महसुलात वाढ केली जाणार आहे, अशी माहितीही पुढे येत आहे.
हा खर्च भागवायचा कसा?
- पालिकेने सध्या हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांसाठी कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला असून, त्यासाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.
- या प्रकल्पांमुळे मोठा आर्थिक भार असल्याने पालिका उत्पन्न वाढीच्या प्रयत्नात आहे. स्वत:चे प्रकल्प राबवताना पालिकेला अन्य प्राधिकरणांनाही मदत करावी लागत आहे. त्यात बेस्ट उपक्रमाला वेळोवेळी आर्थिक मदत द्यावी लागते.
- याशिवाय राज्य सरकारच्या निर्देशावरून मेट्रो प्रकल्पासाठी एमएमआरडीला पाच हजार कोटी रुपये द्यावे लागले आहेत. मध्यंतरी विकासकामांसाठी ठेवी मोडल्याने पालिकेला टीकेलाही सामोरे जावे लागले होते.
पाणीपट्टी वाढणार; पण...
उत्पन्न वाढीसाठी निर्धारित वेळेत मालमत्ता कर वसूल करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. त्याशिवाय पाणी पट्टीत वाढ करण्याचाही प्रस्ताव आहे. मात्र, पालिका निवडणुकीपूर्वी हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता धूसर आहे. उत्पन्न वाढीसाठी कचरा संकलन कर आकारण्याबरोबरच बंद पडलेल्या जकात नाक्यांचा व्यावसायिक वापर केला जाणार आहे, असेही सांगण्यात येत आहे.