]मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस... येथून दररोज शेकडो मेल, एक्स्प्रेस बाहेरील राज्यांत जातात. टर्मिनसचा परिसर गर्दीने खच्चून भरलेला असतो. त्यामुळे येथे २४ तास सुरक्षेचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान आहे. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरून जिन्याने खाली उतरल्यानंतर जवळच प्रवाशांच्या व्यवस्थेसाठी भलीमोठी कायमस्वरूपी शेड उभारली आहे. यात प्रवाशांना पाय ठेवायला जागा नसते. संपूर्ण स्थानकात सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी केली जाते. सोबत डॉग स्क्वाडही असते.
टर्मिनसच्या आतील आणि बाहेरील परिसरावर सीसीटीव्हीची नजर असून, नियंत्रण कक्षाद्वारे येथील हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाते. स्थानकात आलेले प्रवासी ज्या प्रवेशद्वारातून बाहेर पडतात; त्या परिसराच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रवेशद्वारापर्यंत सुरक्षारक्षक आढळला नाही. प्रवेशद्वारावर रिक्षा असलेल्या ठिकाणी आढळलेला एक वाहतूक पोलिस वगळता गुरुवारी दुपारी २ ते ३ मध्ये परिसरात विशेष सुरक्षा आढळून आली नाही.
सुरक्षा वाढविण्याची गरजएलटीटीच्या मुख्य प्रवेशद्वारावरही प्रवाशांसाठी सुविधा उत्तम असली तरी येथील चार आणि पाच क्रमांकांच्या गेटवर सुरक्षारक्षक तैनात नव्हते. मेटल डिटेक्टर तर नावालाही दिसले नाहीत. आरक्षण केंद्रासह बैठक व्यवस्थेमध्येही गर्दी असताना सुरक्षारक्षक नव्हता. मीटर आणि शेअर रिक्षांच्या गर्दीत हा परिसर हरवला आहे. येथील सुरक्षा अधिक वाढविण्याची गरज प्रवाशांनी व्यक्त केली.
तिसरा डोळा आहे...टर्मिनसच्या आतील आणि बाहेरील परिसरांवर सीसीटीव्हीची नजर आहे. सीसीटीव्हींची देखभाल-दुरुस्तीही केली जात असून, ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीवेळी येथील सीसीटीव्हींची देखभाल-दुरुस्ती सुरू असल्याचे निदर्शनास आले.