Join us
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र नाट्य मंदिरमध्ये रंगली दिग्गजांची मैफल; जुगलबंदीनं रसिक मंत्रमुग्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 16:56 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केली जाणारी भारतीय शास्त्रीय संगीताची वार्षिक मैफल भीमांजली यावर्षीही रवींद्र नाट्य मंदिरात रंगली.

मुंबई -

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केली जाणारी भारतीय शास्त्रीय संगीताची वार्षिक मैफल भीमांजली यावर्षीही रवींद्र नाट्य मंदिरात रंगली. हे दहावे आदरांजलीपुष्प होते. विनामूल्य असलेल्या या सोहळ्यात रसिकांनी उस्ताद शुजात हुसेन खान, पं. रूपक कुलकर्णी, पं. अतुल कुमार उपाध्ये, पं. श्रीधर पार्थसारथी, पं. मुकेश जाधव यांची जुगलबंदी अनुभवली.

यावर्षीच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध सतारवादक उस्ताद शुजात हुसेन खान होते. उस्ताद शुजात खान हे इमदादखानी (इटावा) घराण्याच्या सातव्या पिढीचे सतार माईस्त्रो आहेत. या कार्यक्रमात त्यांनी त्यांची खास शैली ‘गायकी अंग’ अवलंबत सतारवादन करून संगीत सभेला बहार आणली. त्यांचा कलाविष्कार आलाप तसेच समृद्ध आणि सूक्ष्म कल्पनांनी सजलेला होता. सतार वादनातून त्यांनी श्रोत्यांना पारलौकिक अनुभूती दिली. आपल्या सतार वादनात त्यांनी कबीर, अमीर खुसरो आणि कृष्ण बिहारी नूर यांच्या रचनांचे गायनही सुरेखरित्या गुंफले होते. उस्ताद शुजात यांनी सतारीच्या तारा झेडून जागृत केलेल्या एकता, भक्ती आणि सामाजिक न्यायाच्या संकल्पना बाबासाहेबांच्या दृष्टिकोनाशी जुळणाऱ्या होत्या.

शुजात खान यांना विविध परंपरांमधील प्रतिष्ठित कलाकारांनी साथ देत आपले स्वरपुष्प वाहिले. पंडित रूपक कुलकर्णी यांनी बासरी वादनाद्वारे गीतात्मक मांडणी आणि भावपूर्ण स्वरांच्या सफरीवरचे आपले प्रभुत्व दाखवून दिले, तर उपाध्ये व्हायोलिन अकादमीचे संस्थापक पंडित अतुल कुमार उपाध्ये यांनी भारतीय आणि पाश्चात्य व्हायोलिन तंत्रांचा संगम साधत अभिनव पद्धतीने राग विस्ताराला नवे परिमाण दिले. कर्नाटकी संगीत परंपरेतील गायक आणि मृदंगम् वादक पंडित श्रीधर पार्थसारथी यांनी आपल्या सादरीकरणातून शास्त्रीय शैलीतील सुस्पष्ट ताल संवाद श्रोत्यांसमोर उलगडला. ज्येष्ठ तबला गुरू पंडित मुकेश जाधव यांनी संवेदनशील साथसंगत आणि प्रभावी एकल वादनाने कार्यक्रमाची तालरचना भक्कमपणे सांभाळली.

प्रातःकाली सुरू झालेल्या या कार्यक्रमाने मोठ्या संख्येने संगीतप्रेमी, अभ्यासक आणि अनुयायांना आपल्याकडे आकृष्ट केले होते.  राष्ट्रनिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारक समितीने आयोजित केलेल्या या संगीत सोहळ्याच्या आयोजनात कलाकारांच्या ताफ्याने आत्ममग्न आलाप, ताल संवाद आणि निखळ शास्त्रीय शुद्धतेने नटलेली एक सुरेल गुंफण सादर केली. सुरांची ही सजावट महोत्सवाच्या उष:काळाच्या भावछटांना जपणारी होती. भीमांजलीच्या दशकभराच्या प्रवासात पंडित हरिप्रसाद चौरसिया, दिलशाद खान, उस्ताद शाहिद परवेझ, पंडित विश्व मोहन भट्ट, पंडित रोनू मुजुमदार, राकेश चौरसिया, साबिर खान, उस्ताद सुलतान खान, अभय सोपोरी, डॉ. एन. राजम, पंडित नयन घोष, डॉ. संगीता शंकर आणि इतर अनेक दिग्गजांनी आपल्या सादरीकरणाने डॉ. आंबेडकरांच्या वारशाला आपली खास सांगितिक आदरांजली वाहिली आहे.

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याने समता, मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक उन्नती या डॉ. आंबेडकरांच्या शाश्वत मूल्यांना स्वर-तालाच्या माध्यमातून उजाळा देणारा एक चिंतनशील मंच म्हणून या महोत्सवाचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले. 

"हा प्रातःकालीन कार्यक्रम खूपच अव्वल दर्जाचा आहे. शास्त्रीय संगीत समजून घेणारा एक विशिष्ट वर्ग असतो, असे सांगून या समृद्ध कलात्मक अनुभवाचे श्रेय आपण राष्ट्राचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांना देत आहोत. बाबासाहेबांची मानवी प्रतिष्ठा आणि समानतेची दृष्टी अशा सुसंवादी कार्यक्रमांच्या आयोजनासाठी प्रेरणा देत राहते" - संजय शिरसाट, सामाजिक न्यायमंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : Musical Giants Mesmerize at Ravindra Natya Mandir in Jugalbandi Performance

Web Summary : Bhimaanjali, a tribute to Dr. Ambedkar, featured Ustad Shujaat Hussain Khan and other maestros. Their jugalbandi, blending classical music traditions, captivated the audience. The event, graced by Minister Sanjay Shirsat, highlighted Ambedkar's values of equality and social justice through soulful melodies.
टॅग्स :संगीत