मुंबई: नवसाला पावणारा बाप्पा म्हणून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, या गर्दीला आवरणे पोलिसांनाही कठीण जाताना दिसते. याच गर्दीत भाविक आणि कार्यकत्यांच्या हाणामारीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यापूर्वी देखील चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण करणारा व्हिडीओ समोर आला होता. याचपार्श्वभूमीवर वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यावतीनं लालबागचा राजा मंडळाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मंडळाचे सदस्य आणि बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांमध्ये दररोज बाचाबाची होत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. व्हीव्हीआयपींना दर्शन देताना विशेष व्यवस्था पुरवली जाते, मात्र वृद्ध आणि लहान मुलांकरता कोणतीही विशेष व्यवस्था नसल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. तसेच येत्या काळात मुंबई पोलीस या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन ठोस कारवाई करतील, अशी अपेक्षा असल्याचंही तक्रारदारांनी म्हटलं आहे. सदर तक्रार लालबागचा राजा मंडळाविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी स्वरुपात दाखल करण्यात आली आहे.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात. मंडपात सुरक्षेसाठी पोलिसांसह मंडळाचे कार्यकर्ते आणि खासगी सुरक्षा रक्षक तैनात आहेत. मात्र, दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी गर्दीवर नियंत्रण आणण्याचे आव्हान कायम आहे. गेल्या काही दिवसांत लालबागच्या रांगेतील विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पहिल्या व्हिडीओत भाविक गेटमधून आत येताना थेट एकमेकांच्या अंगावर कोसळताना दिसत आहेत. यामध्ये लहान मुलांचेही हाल होताना दिसतात. त्यापाठोपाठ शुक्रावारी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये गेटमधून आतमध्ये येण्याच्या धडपडीत कार्यकर्त्यांकडून भाविकांना मारहाण होताना दिसून आले.
हजार पोलिस भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात
पोलीस उपायुक्त प्रशांत कदम सांगतात, जवळपास हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व बाजूने पोलिस लक्ष ठेवून आहेत. पाच गेट आहेत. १०० च्या संख्येने भाविकांना आतमध्ये सोडण्यात येते. गेटमधून आतमध्ये सोडताना भाविक एकाच वेळी आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतात. भाविकांनीही पोलिस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करत घाई करु नये. रांगेत कुणालाही मारहाण झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.