Join us  

पालिकेच्या सी वॉर्डमधील दोन लाचखोर अभियंत्यासह तिघांवर गुन्हा दाखल!

By गौरी टेंबकर | Published: April 06, 2024 6:27 PM

आरोपी कांबळी मरीन लाईन्स परिसरात असलेल्या सी वॉर्डच्या इमारत व कारखाने विभागात कनिष्ठ अभियंता तर पवार हा दुय्यम अभियंता आहे. तर तिसरा आरोपी होडार हा समाजसेवक असल्याचा दावा करतो.

मुंबई: पोटमाळ्याच्या अनधिकृत बांधकामावर निष्काशनाची कारवाई रोखण्यासाठी जवळपास २० लाख रुपयाची मागणी करणाऱ्या पालिकेच्या सी वॉर्ड मधील दोन लाचखोर अभियंत्यांसह तिघांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने अटक केली आहे. त्यांची नावे मंगेश कांबळी (३७), सुरज पवार (४३) तसेच निलेश होडार (३७) अशी असून यांच्याविरोधात  संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपी कांबळी मरीन लाईन्स परिसरात असलेल्या सी वॉर्डच्या इमारत व कारखाने विभागात कनिष्ठ अभियंता तर पवार हा दुय्यम अभियंता आहे. तर तिसरा आरोपी होडार हा समाजसेवक असल्याचा दावा करतो. या प्रकरणातील तक्रारदार यांच्या पार्टनरशिपमध्ये असलेल्या बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरील पोटमाळ्याच्या अनधिकृत बांधकामावर निष्काषन कारवाईची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार फिर्यादी हे कांबळी आणि पवार यांना भेटायला गेले. तेव्हा या दोघांनी कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडे लाच म्हणून २० लाख रुपये मागितले. टेरेसवरील शेडसाठी १५ लाख तर उर्वरित ५ लाख हे पाचव्या मजल्याच्या अनअधिकृत कामावर कारवाई न करण्यासाठी ते मागत होते. तेव्हा या दोघांविरोधात फिर्यादी यांनी एसीबीकडे तक्रार केली. 

त्यांच्या तक्रारीनुसार ४ एप्रिल रोजी एसीबीच्या तपास अधिकाऱ्यांनी पडताळणी करत ५ एप्रिलला सापळा रचून कांबळी, पवार तसेच त्यांच्या वतीने लाचेचा पहिला हप्ता म्हणुन ८ लाख रुपये स्वीकारणाऱ्या होडार याला अटक केली. याप्रकरणी एसीबीचे अधिकारी सध्या अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसमुंबई महानगरपालिका