Join us  

हवा आहे एक उमेदवार; दोन वेळा गड सर केला तरी काँग्रेसचे काही ठरेना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 8:54 AM

दोन वेळा गड सर केला तरी काँग्रेसचे काही ठरेना

सीमा महांगडेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये उत्तर मुंबईची जागा काँग्रेसला घोषित झाली. मात्र, या जागेसाठी सक्षम उमेदवार शोधूनही सापडत नसल्याने काँग्रेसची दमछाक होत आहे. पाचपैकी दोन वेळा येथे  काँग्रेसने विजय मिळवला. तरी सक्षम उमेदवार मिळत नसल्याने उद्धवसेनेच्या उमेदवाराने काँग्रेसच्या तिकिटावर लढावे, असे काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. 

महाविकास आघाडीत काँग्रेसने जाहीर केलेल्या १७ जागांच्या यादीत मुंबई उत्तरचा समावेश करून ही जागा काँग्रेस लढविणार असल्याचे घोषित करण्यात आले. मात्र, काँग्रेसकडे ही जागा लढवून जिंकण्यासाठी सक्षम उमेदवार नसल्याने येथील उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. उद्धवसेनेच्या विनोद घोसाळकर यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढवावी, असा प्रस्ताव काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी मांडला. मात्र, घोसाळकरांकडून त्याला नकार आल्याने काँग्रेससाठी स्थानिक नाळ असलेला आणि पक्षाला चेहरा देणारा उमेदवार देणे आणखी कठीण झाले आहे.

कोणत्या वेळी कोण खासदार१९९९ : राम नाईक (भाजप)२००४ : गोविंदा आहुजा (काँग्रेस)२००९ : संजय निरुपम (काँग्रेस) २०१४ : गोपाळ शेट्टी (भाजप)२०१९ : गोपाळ शेट्टी (भाजप)

उत्तर मुंबईसाठी काँग्रेसकडे सक्षम आणि स्थानिक उमेदवार आहे. मात्र, उमेदवार कोण असेल, याबाबतचा निर्णय हायकमांड घेणार असल्याने थोडा वेळ लागत आहे. मात्र, काँग्रेसकडून लवकरच उत्तर मुंबईच्या  उमेदवारीची घोषणा होईल.- सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ता 

अवघड का? उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात दहिसर, बोरिवली, चारकोप, मालाड, मागाठाणे व कांदिवली (पूर्व) हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघात झोपड्यांची संख्या लक्षणीय आहे. २०१४ पूर्वी या झोपडपट्ट्यांमधील मतदार हा परंपरागत काँग्रेसचा मानला जात असल्यामुळे झोपडपट्टी म्हटली की, काँग्रेस असेच समीकरण होते, मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाही. झोपड्यांमधील हिंदी मतदारांमध्येही काँग्रेसचे काही प्रमाणात वर्चस्व होते, मात्र मोदी-योगी लाटेत आता हा मतदारही भाजपकडे वळला आहे. गेल्या दोन निवडणुकींत शिवसेनेच्या मदतीमुळे मराठी भाषिक मतदारही भाजपकडे गेला. त्यामुळे हा मतदार वळविण्यासाठी ही काँग्रेसला मराठी चेहरा गरजेचा आहे. 

 

टॅग्स :काँग्रेससचिन सावंत