अध्यात्म आणि चित्रकलेचा सुरेख संगम, जहांगीर आर्ट गॅलरीत कार्लेट जोसेफ यांचे प्रदर्शन

By संजय घावरे | Published: October 10, 2023 09:43 PM2023-10-10T21:43:58+5:302023-10-10T21:47:29+5:30

१७ ऑक्टोबरपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले

A beautiful confluence of spirituality and painting, Carlette Joseph exhibition at Jahangir Art Gallery | अध्यात्म आणि चित्रकलेचा सुरेख संगम, जहांगीर आर्ट गॅलरीत कार्लेट जोसेफ यांचे प्रदर्शन

अध्यात्म आणि चित्रकलेचा सुरेख संगम, जहांगीर आर्ट गॅलरीत कार्लेट जोसेफ यांचे प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सध्या कार्लेट जोसेफ यांच्या चित्रांचे एकल प्रदर्शन कला रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. आध्यात्म आणि चित्रकलेचा सुरेख संगम घडवणारे हे प्रदर्शन १७ ऑक्टोबरपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

कार्लेट यांच्या चित्रांमध्ये अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि कला यांचा सुरेख संगम रसिकांना अनुभवायला मिळत आहे. कार्लेट यांच्या कलात्मक प्रवासाची सुरुवात अक्रेलिक, पेन आणि इंक यांसारख्या पारंपरिक माध्यमांनी झाली. या माध्यमात त्यांनी अनेक सौंदर्यपूर्ण आणि कलात्मक अर्थवाही कलाकृतींची निर्मिती केली आहे. नव्या युगातील डिजिटल माध्यमालाही कार्लेट यांनी आपलेसे केले आहे. या माध्यमावरही त्यांनी प्रभुत्व मिळवून कलाकृतींची निर्मिती केली आहे. ऊर्जा आणि आध्यात्मिक प्रकाश हा कार्लेट यांच्या प्रस्तुत प्रदर्शनातील कलाकृतींचा गाभा आहे. माणसाने कितीही भौतिक प्रगती केली तरी कुठेतरी मनात तो अस्वस्थ असतो. या अस्वस्थतेला योग्य दिशा देण्याचे काम अध्यात्म करते. या कलाकृती रसिकांना सकारात्मक दिशा देतात. कार्लेट यांच्या चित्रांचे अजून एक वैशिष्टय म्हणजे त्यांनी वापरलेली कलात्मक रंगसंगती. ही रंगसंगती एकाच वेळी गूढता आणि सकारात्मकता यांचा अनुभव देते. पाहणाऱ्याला तिमिरातून तेजाकडे जाण्याची अनुभूती देते. नाजूक सोनेरी फॉईलने सुशोभित केलेल्या चित्रांसह, ८० कलात्मक डिजिटल कलाकृतींचा संग्रह या प्रदर्शनात आहे.

याव्यतिरिक्त, या प्रदर्शनात अक्रेलिक आणि पेन-शाईच्या माध्यमातून तयार केलेल्या २० पेक्षा जास्त कलाकृतींचा समावेश आहे.

कार्लेट या मानसशास्त्राच्या विद्यार्थिनी आहेत. तसेच त्या तत्त्वज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या अभ्यासक आहेत. त्यामुळे तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि अध्यात्म यांची सुरेख गुंफण कार्लेट यांच्या चित्रांमध्ये पाहायला मिळते. त्यांची चित्रे बघताना सुंदर असा आध्यात्मिक अनुभव रसिक घेऊ शकतात. मानवी जीवन हे प्रवाही आहे. त्यामुळे या प्रवाहाला एका अध्यात्मिक बंधनाची गरज कायम असते. आध्यात्मिक अभ्यास आणि दीर्घ चिंतन यातून या प्रवाहाला एक दिशा मिळू शकते. हेच कार्लेट यांची चित्रे बघताना जाणवते. कार्लेट यांनी चित्रकलेबरोबर फोटोग्राफीमध्येही काम केले आहे. यापूर्वी त्यांनी फोटोग्राफी प्रदर्शनामध्ये यशस्वी सहभाग नोंदवला आहे. मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या कार्लेट यांना कलेची प्रेरणा त्यांच्या छायाचित्रकार वडिलांकडून मिळाली. खोताची वाडीसारख्या ऐतिहासिक नगरात कार्लेट यांचं बालपण गेलं. तिथेच त्यांना चित्रकलेची गोडी लागली. रंगानी भरलेल्या चैतन्यपूर्ण खोताची वाडीने त्यांना कायम प्रेरणा दिली. त्यामुळे फोटोग्राफी आणि चित्रकला आशा दोन्ही माध्यमात कार्लेट यशस्वीपणे कला निर्मिती करतात.

Web Title: A beautiful confluence of spirituality and painting, Carlette Joseph exhibition at Jahangir Art Gallery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.