मुंबई : कचऱ्यात सापडलेल्या पिस्तुलाने एका १२ वर्षीय मुलाने एक राउंड फायर केल्याची घटना दहिसर पूर्वकडील घरटन पाडा येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, या प्रकारामुळे तेथे खळबळ उडाली आहे. दहिसर पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दहिसर पोलिस ठाण्याच्या बीट क्रमांक २ चे हवालदार कदम यांना शुक्रवारी सायंकाळी या घटनेची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता घरटन पाडा क्रमांक २ येथील साईकृपा चाळीच्या पूर्वेकडील मैदानाजवळ कचऱ्यात बेवारस स्थितीत एक पिस्तूल व चार काडतुसे सापडल्याचे समजले.
चौकशीत ते पिस्तूल त्या परिसरात राहणाऱ्या एका १२ वर्षांच्या मुलाने खेळताना पाहिले. ते खेळण्यातील पिस्तूल असल्याचे समजून त्याने त्याचा ट्रिगर ओढल्याने त्यातून चुकून एक राउंड फायर झाला. या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेची गंभीर दखल घेत परिमंडळ १२ चे पोलिस उपायुक्त महेश चिमटे आणि दहिसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने पिस्तूल व चार काडतुसे ताब्यात घेतली.