मुंबई : केंद्र सरकारने नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांपैकी ९८.१८ टक्के नोटा परत बँकेत जमा झाल्या आहेत. त्यामुळे आता केवळ ६,४७१ कोटी रुपये किमतीच्या नोटा लोकांकडे असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शनिवारी स्पष्ट केले. १९ मे २०२३ रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा आरबीआयने केली होती.
या नोटा मागे घेण्याची घोषणा केली तेव्हा ३.५६ लाख कोटी रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा चलनात होत्या. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्यात मोठी घट झाली. त्यामुळे सध्या चलनात ६,४७१ कोटी रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा आहेत. अशा प्रकारे १९ मे २०२३ रोजी चलनात असलेल्या २००० रुपयांच्या नोटांपैकी ९८.१८ टक्के नोटा परत आल्याचे म्हटले आहे. ७ ऑक्टोबर २०२३ ही नोटा बदलण्याची व त्या बँकेत जमा करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, आरबीआयच्या १९ कार्यालयांमध्ये आजही दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करून घेतल्या जातात.
सर्वसामान्य नागरिक कोणत्याही टपाल कार्यालयाच्या माध्यमातून या आपल्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आरबीआयच्या कोणत्याही कार्यालयात पाठवू शकतात. दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतलेला असला तरी या नोटांना अजूनही कायदेशीर चलन म्हणून मान्यता असल्याचे स्पष्ट केले आहे.