मुंबईवर लॉकडाऊनचं संकट?, गेल्या २४ तासांत ९४ नवीन इमारती सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 15:58 IST2021-02-20T04:15:23+5:302021-02-20T15:58:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढे पाच बाधित रुग्ण आढळले तरी संपूर्ण इमारत सील (प्रतिबंधित) करण्याचा ...

मुंबईवर लॉकडाऊनचं संकट?, गेल्या २४ तासांत ९४ नवीन इमारती सील
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढे पाच बाधित रुग्ण आढळले तरी संपूर्ण इमारत सील (प्रतिबंधित) करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. इमारत सील केल्यानंतरही काही रहिवासी घराबाहेर जात असल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईतील तब्बल ९४ इमारती सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत आता ३२१ इमारती सील आहेत.
गेल्या दोन आठवड्यांत मुलुुंड, चेंबूर, अंधेरी पूर्व-जोगेश्वरी पूर्व, बोरिवलीमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. होम क्वारंटाइन असलेले बाधित व काही संशयित रुग्ण नियम मोडून घराबाहेर फिरत आहेत. त्यामुळे महापालिकेने प्रतिबंधित इमारतींचे नियम कठोर केले आहेत. गुरुवारपर्यंत मुंबईत २५७ इमारती सील होत्या. शुक्रवारी यामध्ये ९४ इमारतींची भर पडली आहे.
चेंबूर हॉटस्पॉट
गेल्या आठ दिवसांत चेंबूरमध्ये कोरोना रुग्णांचा संख्या वाढत असल्याने पालिकेने सुमारे ५५० इमारतींना क्वारंटाइनचे नियम पाळा, नाही तर कारवाई करू, असा इशारा दिला होता. मात्र, रहिवाशांच्या मानसिकतेत काही बदल न झाल्यामुळे पाचपेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेली चेंबूर, मैत्री पार्क येथील सफल हाइट, चेंबूर पोलीस ठाण्यासमोरील नवजीवन सोसायटी, सिंधी सोसायटी बंगलाे नं. १३ मधील साई त्रिशूल आणि आरसी मार्ग मारवली गावाजवळ शिवधाम या इमारती सील करण्यात आल्या आहेत.
१४ दिवस बाहेर पडण्यास मनाई
सील इमारतींमधील रहिवाशांना पुढील १४ दिवस इमारतींबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. १४ दिवसांनंतर या इमारतींमधील रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येईल. संख्या कमी झाली तर सील काढले जाईल. मात्र, रुग्णसंख्या कमी झाली नाही तर इमारत सील राहणार आहे.