मुंबई - मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या गेल्या दहा वर्षांत अडीच टक्क्यांनी कमी झाली असली तर अद्याप रस्त्यांवर सुमारे ९१ हजार भटके कुत्रे असल्याची माहिती महापालिका आणि ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडिया या संस्थेने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात समोर आली आहे. महापालिकेच्या ई, एन, आर दक्षिण आणि टी या चार प्रभागांमध्ये फक्त कुत्र्यांची संख्या लक्षणीय रीत्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
महानगरपालिकेच्या वतीने ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडिया यांच्या सहकार्याने मुंबईत बेसलाइन स्ट्रीट डॉग सर्वेक्षण करण्यात आले. यात ९० हजार ७५७ इतके भटके कुत्रे आढळून आले आहेत. शहरातील एकूण ९३० किलोमीटर रस्त्यांवर हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर प्रति किलोमीटर ८.१ टक्के असे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण आढळून आले. झोपडपट्ट्यांमध्ये प्रति एक किलोमीटर चौरस क्षेत्रात २२४ कुत्रे आढळले. या दोन्ही प्रमाणात २०१४ च्या सर्वेक्षणाच्या तुलनेत अनुक्रमे २१.८ टक्के आणि २७.४ टक्के इतकी घट नोंदवण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. २०१४ मध्ये मुंबईत ९५,१७२ इतकी कुत्र्यांची संख्या नोंदवण्यात आली होती, जी प्रति किलोमीटर १०.५४ टक्के इतकी होती. एकूणच मुंबईतील १९ वार्डांमध्ये कुत्र्याचे प्रमाण या सर्वेक्षणात ३१.६ टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले आहे.
उर्वरित १४ विभागांत संख्येत घट झाली असली तरी ई, एन, आर दक्षिण आणि टी या विभागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण १९.९ टक्के वाढले आहे, तर डी प्रभागातील कुत्र्यांची घनता स्थिर राहिल्याचे निरीक्षण आहे.
स्तनपान करणाऱ्या मादींचे प्रमाण ७.१ टक्क्यांपर्यंत घसरले, तरीही पिल्लांची संख्या ४.३ टक्क्यांवर गेली. सर्वसाधारणपणे घट झाली असली, तरी चार वॉर्डांमध्ये कुत्र्यांची घनता वाढणे आणि विशेषत: आर दक्षिण व टी या सीमावर्ती वॉर्डांमध्ये मुंबईबाहेरून कुत्र्यांचे स्थलांतर किंवा मानवी हस्तक्षेपामुळे पिल्लांचे जगण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर येत आहे.
तक्रारींमध्येही घट कुत्र्याशी संबंधित तक्रारी आणि श्वानदंशाच्या घटनांमध्ये सन १९९७ च्या तुलनेत सामान्यतः घट झाली आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये कोरोनानंतर तक्रारी आणि घटना या दोन्हींमध्ये वाढ झाली होती. सर्वसाधारणपणे जुलै आणि ऑगस्टच्या पावसाळी हंगामात कुत्र्यांशी संबंधित तक्रारी शिगेला पोहोचतात. हा काळ प्रजननाचा असल्याने या काळात कुत्रे अधिक आक्रमक असतात; पण त्यांचे चावा घेण्याचे प्रमाण मात्र या काळात कमी असते. श्वानदंशाचे प्रमाण हिवाळा आणि वसंत ऋतूच्या उत्तरार्धात अधिक वाढतात, असेही या सर्वेक्षणात समोर आल्याचे पालिकेने म्हटले आहे.