९०० कोटींचा सायबर गुन्हेगारी सुरक्षा प्रकल्प लवकरच होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:28 IST2021-02-05T04:28:56+5:302021-02-05T04:28:56+5:30
गृहमंत्री अनिल देशमुख लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सायबर गुन्हे राेखण्यासाठी ९०० कोटींचा सायबर गुन्हेगारी सुरक्षा प्रकल्प हाती घेतला ...

९०० कोटींचा सायबर गुन्हेगारी सुरक्षा प्रकल्प लवकरच होणार सुरू
गृहमंत्री अनिल देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सायबर गुन्हे राेखण्यासाठी ९०० कोटींचा सायबर गुन्हेगारी सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे. ताे लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी, प्रजासत्ताक दिनी सायबर पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना देशमुख म्हणाले की, माहिती-तंत्रज्ञानाने जग व्यापले असताना ऑनलाईन माहितीची देवाण-घेवाण, आर्थिक व्यवहार वाढत आहेत. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होत आहे. पाच ट्रिलियन डॉलरने सायबर गुन्हे जगभरात वाढत आहेत. महाराष्ट्रातही हे प्रमाण आणि प्रकार वाढत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याची मदत होईल.
समाजमाध्यमांचा वापर करून पोलिसांना, राजकीय व्यक्ती किंवा महिलांना बदनाम करणे, अफवा पसरवणे तसेच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. अशा घटना राेखण्यासाठीही सायबर पाेलीस ठाणे उपयाेगाचे ठरेल. फेक प्रोफाईल तयार करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे, त्याकडेही लक्ष देता येईल.
मुंबईत कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी, गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे, या महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष केंद्रीत करून महाराष्ट्र, मुंबई पोलीस दल सातत्याने काम करत असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. अँटी नार्कोटिक सेल अधिक सक्षम करण्याची गरज असून, त्याचा प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
तर सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस ठाण्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. स्वागत कक्षाच्या माध्यमातून मायेची आणि आपलेपणाची ऊब जाणवेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
.....................