Join us
Daily Top 2Weekly Top 5

९० वर्षांच्या आजीची नातवाशी उच्च न्यायालयामुळे होणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:26 IST

मुलाला मुंबईत आणा आणि काही तास वयोवृद्ध याचिकाकर्तीला भेटू द्या, दिल्लीस्थित सुनेला निर्देश; न्यायालयाला संपर्क तपशील देण्याचेही आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दिल्लीत राहणाऱ्या एका महिलेला तिच्या १४ वर्षांच्या मुलाला मुंबईत आणण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. हा मुलगा आता आजारपणाशी दीर्घकाळ झुंज देत असलेल्या ९० वर्षांच्या आजीला भेटू शकेल. नातवाला भेटण्यासाठी आजीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सूनबाईशी असलेल्या दुराव्यामुळे आजीला नातवाला भेटू देण्यात आले नाही. आपल्या एकुलत्या एक नातवाला भेटण्याची संधी द्यावी, अशी विनंती आजीने याचिकेत केली होती. 

न्या. भारती डांगरे व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने ९० वर्षांच्या आजीची व्यथा लक्षात घेत म्हटले की, आयुष्याच्या या टप्प्यावर याचिकाकर्तीची एकमेव इच्छा आहे की वेळ निघून जाण्यापूर्वी आपल्या नातवाला भेटणे. न्यायालयाने कफ परेड येथे राहणाऱ्या याचिकाकर्तीला तिच्या नातवाला भेटण्यासाठी सूनबाईला मुलाला मुंबईत आणण्याचे निर्देश दिले.

न्यायालयाचे निर्देश असे... मुलाला मुंबईत आणल्यानंतर काही तास आजीला भेटू द्यावे. तसेच मुंबई सोडण्यापूर्वी मुलाची आणि आजीची भेट घालून द्यावी.याशिवाय, दर महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या रविवारी आजीची आणि मुलाची भेट घडेल याची खात्री करावी. न्यायालयाला आवश्यकतेनुसार संपर्क तपशील व पत्ते उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले.

आजीने काय म्हटले होते याचिकेत?याचिकाकर्त्या महिलेने याचिकेत म्हटले की, मुलाने २००७ मध्ये विवाह केला होता आणि त्यानंतर ते दांपत्य तिच्यासोबत राहत होते. २०११ मध्ये त्यांना मुलगा झाला; मात्र २०१३ मध्ये याचिकाकर्त्यांच्या मुलाचे निधन झाले. त्यानंतर सुनेने सासरशी सर्व संबंध तोडले. याचिकाकर्तीने अनेकदा विनंती करूनही सुनबाईने मुलाला भेटू दिले नाही, त्याच्याशी संपर्क साधू दिला नाही किंवा दोघांमध्ये संवादही घडू दिला नाही.

आजीने नातवाशी संपर्क साधण्यासाठी अनेक प्रयत्न केले. २०१५ मध्ये त्यांनी आपल्या वाढदिवसाला सूनबाई व नातवाला आमंत्रित केले होते; तसेच २०२४ मध्ये नातवाचा फोटो मागितला होता, मात्र दोन्ही वेळा नकार देण्यात आला. २०२५ मध्ये याचिकाकर्त्यांनी सुनेला नातवाशी बोलू देण्याची विनंती केली; मात्र तिने ती नाकारून उलट ३० कोटी रुपयांची मागणी केल्याचाही आरोप याचिकेत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : High Court grants 90-year-old grandmother visit with grandson.

Web Summary : Mumbai High Court allows a 90-year-old grandmother to meet her 14-year-old grandson after a legal battle. Estranged from her daughter-in-law, the grandmother sought court intervention to see her only grandson, leading to court-ordered visits.
टॅग्स :उच्च न्यायालय