Join us
Daily Top 2Weekly Top 5

होम क्वारंटाईन रुग्णांमध्ये महिन्याभरात ९० टक्के घट; सध्या ३४ हजार ५९० रुग्णांवर घरीच उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 00:00 IST

कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या सहा लाख २० हजार एवढी होती.

मुंबई - कोविडची तिसरी लाट महिन्याभरातच नियंत्रणात आल्याने होम क्वारंटाईन रुग्ण संख्येत ९० टक्क्यांनी घट झाली आहे. १७ जानेवारी रोजी मुंबईत नऊ लाख ३० हजार मुंबईकर गृह विलगीकरणात होते. मात्र आता कोरोनाचा प्रसार पूर्णपणे आटोक्यात आला असल्याने सध्या केवळ ३४ हजार ५९० रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. 

कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या सहा लाख २० हजार एवढी होती. मात्र २१ डिसेंबरपासून मुंबईत सुरु झालेल्या कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये ९० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. त्यामुळे घरीच उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढत गेली. संशयित, बाधित मात्र कोणतीही लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे १७ जानेवारीपर्यंत गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या नऊ लाख ३० हजारांवर पोहोचली होती. 

या काळात महापालिकेने गृह विलगीकरणातील रुग्णांवर वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बारीक लक्ष ठेवण्यात येत होते. त्यांची दिवसांतून चार ते पाचवेळा विचारपूस केली जात होती. मुंबईत कोविड लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने तिसऱ्या लाटेत बाधित रुग्णांना फारसा त्रास झाला नाही. त्यामुळे तीन ते चार दिवसांच्या कालावधीत रुग्ण बरे होऊ लागले. त्यामुळे आता केवळ ३४ हजार ५९० रुग्णचं होम क्वारंटाईन आहेत. 

  •  दररोजच्या बाधित रुग्णांचा आकडा २० हजारांवर पोहोचल्याने त्यांच्या संपर्कातील ४० ते ४५ हजार नागरिकांचा शोध घेऊन आवश्यकतेनुसार त्यांचे विलगीकरण केले जात होते. यामुळे दुसऱ्या लाटेच्या तुलनेत यावेळेस दुप्पट रुग्ण होम क्वारंटाईन होते. 
  • एप्रिल २०२१ मध्ये सहा लाख २० हजार नागरिक होम क्वारंटाईन होते. २१ डिसेंबर २०२१ रोजी ३० हजार लोक घरात उपचार घेत होते. 
  • आतापर्यंत होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण - एक कोटी दोन लाख ३५ हजार ४२१
टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका