Join us  

दुर्मीळ हृदयविकारावर मात; 9 वर्षीय तेजसवर यशस्वी शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 7:04 AM

दुर्मीळ हृदयविकार असलेल्या धुळे येथील तेजस अहिरे या ९ वर्षीय मुलाला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. वयाच्या पहिल्या वर्षी त्याच्यात जन्मजात हृदयविकार असल्याचे निदान झाले. तेजस हा 'ब्ल्यू बेबी' प्रकारात मोडत असून त्याला धाप लागत होती

मुंबई - दुर्मीळ हृदयविकार असलेल्या धुळे येथील तेजस अहिरे या ९ वर्षीय मुलाला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. दक्षिण मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील सल्लागार बालशल्यचिकित्सक डॉ. सुरेश जोशी आणि इंटरव्हेन्शनल पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. मनीष चोखंद्रे यांच्या नेतृत्वाखालील बालशल्यचिकित्सकांच्या चमूने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. वयाच्या पहिल्या वर्षी त्याच्यात जन्मजात हृदयविकार असल्याचे निदान झाले. तेजस हा 'ब्ल्यू बेबी' प्रकारात मोडत असून त्याला धाप लागत होती तसेच वजन वाढत नव्हते. त्याची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना समजले की, त्याच्या शरीरातील महाधमन्यांची अदलाबदल झाली आहे, हृदयाच्या खालील दोन कप्प्यांमध्ये दोन मोठी छिद्र आहेत आणि फुफ्फुसामध्ये रक्तपुरवठ्याची कमतरता होती.

एका आरोग्यशिबिराच्या माध्यमातून डॉ. सुरेश जोशी आणि त्यांच्या चमूला तेजसबद्दल विस्तृत माहिती मिळाली. आर्थिक अडचणींमुळे तेजसच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर लहानपणी उपचार केले नाहीत. अशा प्रकारच्या रुग्णावर सामान्यपणे दोन टप्प्यांमध्ये (ग्लेन शंट आणि फॉन्टॅन कम्प्लिशन) शस्त्रक्रिया करण्यात येते. अशा प्रकारची शस्त्रक्रिया (ज्यात दोन शस्त्रक्रिया दोन महिन्यांच्या अंतराने करण्यात येतात) करणारे दक्षिण मुंबईतील वोक्हार्टहॉस्पिटल हे पश्चिम भारतातील पहिलेच हॉस्पिटल ठरले. यात शस्त्रक्रिया तंत्राच्या पहिल्या टप्प्यात थोडासा बदल करून पुढील टप्पा शस्त्रक्रियेशिवाय कॅथलॅबमध्ये करण्यात आला. हे तंत्र उपयोगात आणल्याने दुसऱ्या शस्त्रक्रियेची आवश्यकता आणि त्यातील गुंतागुंत टाळण्यात आली आणि हॉस्पिटलमधील वास्तव्यही कमी झाले.

गुंतागुंतीच्या आंतररचनेमुळे हृदयांतर्गत दुरुस्ती शस्त्रक्रिया करता येत नाही. त्यामुळे तेजसवर ग्लेन शंट आणि त्यानंतर फॉन्टॅन शस्त्रक्रिया किंवा युनिव्हेंट्रिक्युलर पाथवे शस्त्रक्रिया करणे हाच पर्याय उपलब्ध होता. युनिव्हेंट्रिक्युलर पाथवेमध्ये अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या २ रक्तवाहिन्या फुफ्फुसांपर्यंत जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया करून जोडण्यात येतात. पहिल्या टप्प्यात अशुद्ध रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी फुफ्फुसाच्या रक्तवाहिनीला जोडण्यात येते आणि दुसऱ्या टप्प्यात शरीराच्या खालील भागातील अशुद्ध रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी शस्त्रक्रियेने ट्युबच्या माध्यमातून फुफ्फुसाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीला जोडण्यात येते. परिणामी, संपूर्ण अशुद्ध रक्त फुप्फुसामध्ये शुद्धिकरणासाठी नेण्यात येते आणि ऑक्सिजनेटेड रक्त हृदयाद्वारे शरीराला पुरविण्यात येते. ही शस्त्रक्रिया टप्प्याटप्प्याने करण्यात येते जेणेकरून शरीर या नव्या अभिसरण स्थितीशी जुळवून घेऊ शकेल.

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ड्ट हॉस्पिटलमधील सल्लागार बालशल्यचिकित्सक डॉ. सुरेश जोशी म्हणतात, "तेजसच्या बाबतीत पहिल्या टप्प्यातच शरीराच्या खालच्या भागाकडून फुफ्फुसाकडे रक्त वाहून नेण्यासाठी नळी जोडण्यात आली, पण त्यातील वहनमार्ग मेम्ब्रेनचा उपयोग करून बंद करण्यात आला आणि या नळीमध्ये उपाययोजना करून डिऑक्सिजनेटेड रक्त हृदयापर्यंत पोहोचेल, अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली, जेणेकरून फुफ्फुसामध्ये अचानक रक्ताचा प्रवाह वाढणार नाही आणि शस्त्रक्रियेचा वापर न करता दुसरा टप्पाही पार पाडता येईल. त्यामुळे शरीराच्या आंतररचनेचा विचार करता ट्युब तेथे अस्तित्वात होती आणि शरीरशास्त्रीय विचार करता या ट्युब पहिल्या टप्प्याचे/ग्लेन शंटचे काम करत होती."

सहा महिन्यांनी इंटरव्हेन्शनल पीडियाट्रिक कार्डियोलॉजिस्ट डॉ. मनीष चोखंद्रे यांनी फॉन्टानची प्रक्रिया कॅथलॅबमध्ये पार पाडली. त्यांनी ट्युब आणि फुफ्फुसातील रक्तवाहिनीमधील मेम्ब्रेनला छेद दिला आणि फुग्याने वहनमार्गाचे प्रसरण केले आणि दुसरे छिद्र उपकरणाने बंद केले (हृदयाला रक्त पोहोचविणारे), जेणेकरून शरीराच्या खालील भागातील अशुद्ध रक्त कोणताही अडथळा न येता थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकेल."

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ड्ट हॉस्पिटलमधील इंटरव्हेन्शनल पीडियाट्रिक कार्डियोलॉजिस्ट डॉ. मनीष चोखंद्रे म्हणतात, "भारतात अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्याचे संदर्भ उपलब्ध नाहीत आणि परदेशातील हाताच्य बोटावर मोजण्याइतक्या वैद्यकीय केंद्रांमध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात येते. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला खूप फायदा होतो - यात छातीला छेद देण्याची आवश्यकता नसते, प्रकृती लवकर सामान्य होते,हॉस्पिटलमधील वास्तव्य कमी होते, गुंतागुंत कमी होते, शस्त्रक्रियेनंतर वेदना कमी होतात आणि वाजवी खर्चात ही शस्त्रक्रिया होते. 

टॅग्स :हॉस्पिटलहृदयरोग